Maratha Reservation – गेल्या दोन दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे लाखो मराठ्यांसह मुंबईत आंदोलन करताहेत. या आंदोलनाला काही राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. तर यावरुन भाजपा आणि खासदार संजय राऊत यांच्यात चांगलीच जुंपली आहे. मुख्यमंत्री असताना नाकर्तेपणामुळे सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकवून शकलेल्या आपल्या आका उद्धव ठाकरे यांना जाऊन आधी प्रश्न विचारा भारतीय जनता पक्ष, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायम मराठा समाजाच्या बाजूने उभे राहून त्यांना देण्याचं काम केलेलं आहे.
सातत्याने मराठा समाजाचा अपमान करण्याची मालिका तुम्ही सुरू ठेवली तर तुम्हाला मराठे ढेकण्यासारखं चिरडतील तोंड सांभाळून बोला. मराठा आंदोलकांना ढेकणाची उपमा देताना लाज वाटत नाही का? अशी टिका भाजपा प्रवक्ते अजित चव्हाण यांनी संजय राऊतांवर केली आहे.
मराठा-ओबीसीमध्ये भांडण लावण्याचं काम
दरम्यान, आम्ही वेळप्रसंगी मनोज जरांगे यांच्यावर टीका करत असलो, तरी मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. कारण नेतृत्व कोण करते यापेक्षा समाजाला काही मिळालं पाहिजे हे आमचं म्हणणं आहे. मराठा-ओबीसी मध्ये भांडण लावण्याचा आपला जुना उद्योग तुम्ही जरूर करा, पण तो करत असताना आमच्या आया-बहिणींचा अपमान करणाऱ्या आमच्या संघटित मोर्चाला मुका मोर्चा संबोधणाऱ्या संजय राऊत आपल्या औकातीत राहा, मराठ्यांशी नाद करायचा नाही, असा इशारा भाजपा प्रवक्ते अजित चव्हाण यांनी दिला आहे.
उद्धव ठाकरेंनी शेपूट घातलं होतं
दुसरीकडे यापूर्वीही संजय राऊतांनी मराठा समाजाच्या शांततापूर्ण मोर्चांना मुकामोर्चा म्हणत त्यांचा अपमान केला होता. मराठा आंदोलक ढेकून नाही तर संघर्षयोद्धे, ते आपली न्याय मागणी मांडण्यासाठी आंदोलन करत आहेत. मराठा आंदोलकांना ढेकूण म्हणणं हे महाराष्ट्र आणि आमचे मराठा बांधव सहन करणार नाहीत. शेपूट आम्ही नाही तर तुमच्या महाविकास आघाडीच्या सरकारने घातलं होतं. उद्धव ठाकरेंनी शेपूट घातलं आणि मूर्खपणा केला, म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला दिलेलं आरक्षण गेलं होतं हे लक्षात ठेवा. अशा इशारा प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांना दिला आहे.





