अहिल्यानगर जिल्ह्यातील शनि-शिंगणापुरातून मोठी बातमी समोर येत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये विविध प्रकारचे गैरव्यवहार झाल्याचे समोर येत होतं. ज्यामध्ये ॲप बनावट प्रकरण, बोगस कर्मचारी भरती घोटाळा त्याचबरोबर आर्थिक गैरव्यवहार त्यातून झालेल्या अधिकाऱ्यांच्या आत्महत्या मात्र आता शनिशिंगणापूरचं विश्वस्त मंडळ अखेर बरखास्त करण्यात आलं आहे. या काळात जिल्हाधिकारी या ठिकाणी आगामी काळात सर्व सुत्रं जिल्हाधिकाऱ्यांच्या हाती असणार आहेत.
विश्वस्त मंडळ बरखास्त, जिल्हाधिकाऱ्यांकडे सूत्रे
श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाच्या व्यवस्थापनाखाली असताना, देवस्थानच्या प्रशासनात विविध प्रकारच्या अनियमितता, बनावट अॅप्स संदर्भातील घोटाळा, आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचार, देवस्थानातील हिंदू व मुस्लिम धर्मीय कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेली वैमनस्यपूर्ण परिस्थिती, श्री शनिदेवाचे चौथऱ्यावरुन वाद, यावरुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे, तसेच देवस्थानचे उप कार्यकारी अधिकारी यांच्या आत्महत्येसारख्या अत्यंत गंभीर घटना शासनाच्या निदर्शनास आलेल्या आहेत. त्यानंतर हे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले आणि पुढे शासनाच्या पुढाकाराने नवीन विश्वस्त मंडळ गठित केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

बोगस अॅप; आणि कोट्यवधींचा घोटाळा
आमदार विठ्ठल लंघे आणि आमदार सुरेश धस यांनी नकली ॲप तयार करून भाविकांकडून पूजेसाठी त्यावर पैसे घेतले जात असल्याचा प्रकारही सभागृहात उपस्थित केला होता. धस यांनी आरोप केला की या अॅपच्या माध्यमातून किमान 500 कोटींची रक्कम गोळा करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, चौकशी समितीच्या, कागदोपत्री दाखवलेल्या एकूण 2474 कर्मचाऱ्यांपैकी कोणाचे मस्टर सापडले नाही, त्यांचा हजेरीपटही नव्हता आणि कोणाची सही देखील नव्हती. घोटाळेबाजांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनाच बँक खाती उघडायला लावली होती. मंदिराच्या खात्यातून अस्तित्वात नसलेल्या कर्मचाऱ्यांना नियमितपणे पगार मिळत होता. पगाराची रक्कम प्रत्यक्षात कार्यकर्त्यांच्या खात्यात जात होती.
देवस्थान आतापर्यंत 250 ते 300 कर्मचाऱ्यांवर व्यवस्थित चालत होते. मात्र घोटाळेबाजांनी कागदोपत्री 2447 कर्मचारी नियुक्त केल्याचे दाखवले. हे सर्व कर्मचारी बोगस होते. देवस्थानच्या रुग्णालयात 327 कर्मचारी कार्यरत असल्याचे कागदोपत्री दाखवले होते. प्रत्यक्षात तपासणीत रुग्णालयात एकही रुग्ण नव्हता. 15 खाटा, 80 वैद्यकीय आणि 247 अकुशल कर्मचारी असे दाखवले असताना, प्रत्यक्षात केवळ 4 डॉक्टर आणि 9 कर्मचारी हजर होते. अस्तित्वात नसलेल्या रुग्णालयाच्या बागेच्या देखरेखीसाठी 80 कर्मचारी दाखवण्यात आले होते. अशा प्रकारे पैशांच्या अफरातफरीचा गोरख धंदा त्या ठिकाणी सुरू होता.











