भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणात मुंबई आणि बंगळुरूसारख्या महानगरांमध्ये महागडे फ्लॅट खरेदी करत आहेत, परंतु या खरेदीमुळे अनेक जण आर्थिक सापळ्यात अडकत आहेत. वाढलेले घरांचे दर, उंच व्याजदर आणि दीर्घकालीन ईएमआयमुळे कुटुंबांवर आर्थिक ताण वाढत आहे. महिन्याच्या उत्पन्नाचा मोठा भाग कर्जफेडीमध्ये जात असल्याने बचत आणि इतर गरजा पूर्ण करणे कठीण बनले आहे. अशा संपूर्ण परिस्थितीत तज्ज्ञांचा महत्वपूर्ण सल्ला तुमच्या नक्कीच कामी येईल…
घर अथवा फ्लॅट खरेदी करताय? सावधान!
मुंबई आणि बंगळूरुसारख्या मोठ्या शहरांमध्ये घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. कारण या शहरांमध्ये घरांच्या किमती इतक्या वाढल्या आहेत की सामान्य माणसाला घर घेणं शक्यच नाही. जर कोणी मध्यमवर्गीय माणूस कर्ज काढून घर घेण्याचा विचार करत असेल, तर तो अक्षरशः उद्ध्वस्त होऊ शकतो. मोठ्या शहरांमध्ये घर घेणं हे आता श्रीमंत होण्याचा मार्ग राहिलेला नाही, उलट ते तुम्हाला मोठ्या अडचणीत टाकू शकतं. तज्ज्ञांनी स्पष्ट केलंय की आजकालच्या शहरी भारतीयांसाठी घर विकत घेण्यापेक्षा भाड्याने राहणं जास्त फायद्याचं आहे.

घर खरेदी करताना ‘या’ बाबी लक्षात घ्या !
मुंबईमध्ये आजच्या काळात एका 2 BHK फ्लॅटची किंमत 2 ते 2.2 कोटी रुपये आहे. तर बंगळूरुमध्ये हाच फ्लॅट 1.2 ते 1.4 कोटी रुपयांमध्ये मिळतो. याउलट, या शहरांमध्ये एका कुटुंबाची वार्षिक कमाई फक्त 20 ते 30 लाख रुपये आहे. म्हणजे घराची किंमत कुटुंबाच्या कमाईच्या 8 ते 12 पट आहे. पण जगात कुठेही घराची किंमत कमाईच्या 3 ते 5 पट असणं योग्य मानलं जातं.
2013 ते 2023 या काळात मुंबईत प्रॉपर्टीच्या किमतींमध्ये 1% ची घट झाली आहे. संपूर्ण देशातही 2010 पासून प्रॉपर्टीच्या खऱ्या किमतींमध्ये वर्षाला फक्त 3% वाढ झाली आहे. तर, भाड्याने मिळणारा परतावा फक्त 2% च्या आसपास आहे, जो जगातल्या सर्वात कमी रिटर्नपेक्षा एक आहे. त्यामुळे गुंतवणुकीचे इतर पर्याय वापरून तुम्ही अधिक श्रीमंत होऊ शकता.
EMI च्या सापळ्यापासून वेळीच व्हा सावध!
तज्ज्ञांच्या मते होम लोनच्या EMI बद्दलही आपलं मत मांडलं आहे. त्यांनी होम लोनच्या EMI ला एक ‘ट्रॅप’ म्हणजेच सापळा म्हटले आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलंय की, मुंबईत 2 कोटी रुपयांच्या फ्लॅटसाठी दर महिन्याला 1.4 लाख रुपयांपेक्षा जास्त EMI भरावा लागतो. हा EMI कुटुंबाच्या एकूण कमाईच्या 50 ते 70% पर्यंत असतोय. जगभरातील आर्थिक सल्लागार हेच सांगतात की घराचं भाडं किंवा EMI तुमच्या कमाईच्या 30% पेक्षा जास्त नसावे.











