अखेर पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेच्या विरोधात गुन्हा दाखल; प्रकरणात गौरीच्या कुटुंबाचे धक्कादायक दावे

Rohit Shinde

मुंबईतून गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणात सातत्याने नवनव्या घडामोडी समोर येत आहेत. त्यानंतर आता पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी यांनी राहत्या घरात स्वत:ला संपवले. त्यानंतर गौरीच्या कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीनंतर अखेर अनंत गर्जेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात गौरीच्या कुटुंबियांकडून सातत्याने धक्कादायक दावे केले जात आहेत. अनेक नवे खुलासे या प्रकरणात होताना दिसत आहेत.

अनंत गर्जेसह तीन जणांवर गुन्हा

पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जच्या पत्नी, डॉक्डर गौरी पालवे-गर्जे यांनी मानसिक तणावात येऊन टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी मुंबईतील राहत्या घरात आत्महत्या केली. अनंत गर्जे यांचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा दावा गौरी यांनी केला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून गौरी आणि अनंत यांच्यामध्ये सतत भांडणे होत होती. अखेर या सगळ्याला कंटाळून गौरीने काल स्वत:ला संपवले. आता या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरीच्या आत्महत्येनंतर तिच्या वडिलांनी वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

समोर येणाऱ्या धक्कादायक माहितीनुसार, गौरीला आत्महेत्येपूर्वी  अनंतच्या आधीच्या पत्नी किरणच्या गर्भवती असल्याची कागदपत्रं मिळाल्याने ती अस्वस्थ होती. ती कागदपत्रे तिने आम्हाला पाठवली होती असा गौरीच्या वडिलांचा जबाब आहे. वडिलांच्या जबाबानंतर डॉक्टर गौरी गर्जे यांच्या आत्महत्येप्रकरणी पती, नणंद आणि दिरावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. गौरी गर्जेला मारहाण करून मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे देखील तक्रारीमध्ये सांगण्यात आले आहे.

दाखल एफआयआर मध्ये काय?

मृत गौरी गर्जेचे वडील म्हणतात, ” माझी मुलगी नामे गौरी हीस तिचा पती अनंत गर्जे याने लग्न झाल्यानंतर काहि कालावधीतच किरकोळ कारणावरून वाद घालण्यास तसेच किरण सिध्दार्थ इंगळे या महिलेसोबत असलेले अफेरबाबत गौरी हिरा समजल्याने तिस मानसिक व शारिरिक त्रास देण्यास सुरुवात केली व जर तिने तिचे माहेरच्या लोकांना याबाबत काही सांगितले तर स्वतःचे जीवाचे काहीतरी बरेवाईट करेल अशी धमकी देवुन तिला ब्लॅकमेल करून त्रास देत असे. तसेच अनंत गर्जे यांची बहिण शीतल राजेंद्र आंधळे हि देखील गौरी हिस जर तुझे अनंत याचेशी जमत नसेल तर त्याचे दुसरे लग्न लावून देऊ अशी धमकी देत असे.”

“त्यानंतर दिनांक 22/11/2025 रोजी अनंत भगवान गर्जे यांनी मला फोन करून सांगितले की, गौरी हीने आत्महत्या केली आहे. म्हणुन माझी मुलगी गौरी हिच्या मृत्युस तिचा पती अनंत भगवान गर्जे, बहीण शीतल भगवान गर्जे-आंधळे, दीर अजय भगवान गर्जे हे जबाबदार असून जावई अनंत गर्जे हा गौरी हिने आत्महत्या केल्याचे सांगत असला तरी त्यामध्ये खरेच आत्महत्या आहे की काही घातपात आहे? याबाबत माझी मुलगी गौरी हिंचे आत्महत्येचा कायदेशीर तपास होवून सत्य समोर येणेबाबत तपास होऊन मला न्याय मिळावा म्हणून वरील तीन लोकांविरूध्द माझी कायदेशीर तक्रार आहे,” अशी नोंद एफआयवर मध्ये आहे.

“प्रकरणाशी पंकजा मुंडेंचा संबंध नाही”

तसेच मृत गौरी पालवे-गर्जे यांच्या कुटुंबियांनी या प्रकरणाशी मंत्री पंकजा मुंडेंचा काडीमात्र संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या प्रकरणातून पंकजा मुंडे आधीच सेफ झाल्या आहेत. शिवाय, पीएच्या घरी अशी घटना घडल्यामुळे पंकजा मुंडेंचे बीडमधील सर्व नियोजित दौरे आधीच रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. प्रकरणाबाबत पंकजा मुंडेंनी अद्याप कोणतीही भूमिका मांडलेली नाही.

ताज्या बातम्या