मनसे नेते अमित ठाकरेंसह 70 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल; नवी मुंबईतील नेरूळमध्ये काय घडलं?

Rohit Shinde

नवी मुंबई महापालिकेच्यावतीने नेरुळ सेक्टर १ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाचा कायापालट करण्यात आला व त्या ठिकाणी शिवपुतळा बसवल्यानंतरही मागील अनेक महिने उद्घाटनाविना पुतळा झाकून ठेवण्यात आला होता. नवी मुंबईत पक्षाच्या विविध कार्यक्रमांसाठी आलेल्या अमित ठाकरे यांनी अचानक या पुतळ्याचे लोकार्पण केले. हा कार्यक्रम कोणतीही शासकीय परवानगी न घेता करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच जमावबंदी आदेश लागू असताना मोठ्या संख्येने मनसैनिक या ठिकाणी जमले होते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता निर्माण झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

अमित ठाकरेंसह 70 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

मनसे नेते अमित ठाकरेंसह 70  मनसैनिकांवर नेरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जमावबंदीचे उल्लंघन, परवानगीशिवाय कार्यक्रम आयोजित करणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेरूळ येथील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ भव्य पुतळा गेल्या अनेक महिन्यांपासून अनावरणाच्या प्रतीक्षेत होता. नवी मुंबईत पक्षाच्या विविध कार्यक्रमांसाठी आलेल्या अमित ठाकरे यांनी अचानक या पुतळ्याचे लोकार्पण केले. त्यानंतर आता हे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

चांगल्या कार्यासाठी गुन्हा दाखल -अमित ठाकरे

या प्रकरणाबाबत अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलो होते की, अशा कार्यासाठी माझ्यावर गुन्हा दाखल झाला तर त्याचे स्वागतच करीन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण केल्याचा मला अभिमान आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील हा पहिलाच गुन्हा आहे. , मनसेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या कारवाईबद्दल नाराजी व्यक्त केली असून हा प्रकार राजकीय दबावामुळे झाल्याचा आरोप केला आहे. मात्र पोलिसांनी सर्व कारवाई कायदेशीर चौकटीत राहून केल्याचे सांगत, पुढील तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे. परिसरामध्ये काहीशे तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

ताज्या बातम्या