पवईत ओलीस ठेवलेल्या मुलांची सुखरूप सुटका; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू झाल्याची माहिती

Rohit Shinde

पवईत मुलांना ओलीस ठेवल्याची माहिती वाऱ्याच्या वेगाने पसरली आणि एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस पथक, अग्निशमन दालचे जवान, कमांडो घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अतिशय सावधगिरी आणि हुशारीने हे रेस्क्यू ऑररेशन राबवत सर्व मुलांची सुखरूप सुटका केली.

जखमी आरोपी रोहितचा मृत्यू झाल्याची माहिती

अग्निशमन दल आणि मदतीने अखेर ओलीस ठेवणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेत मुलांची सुटका करण्यात आली. यावेळी, आरोपी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली असून पोलिसांच्या चकमकीत आरोपी रोहित आर्यचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर झाला असून आरोपीने पोलिसांवर गोळी झाडल्यानंतर पोलिसांनीही जशास तसं प्रत्युत्तर दिलं. त्यावेळी, आरोपीच्या छातीत गोळी लागली होती. त्यामुळे, रोहित आर्यला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

या स्टुडिओतून 17 मुले, एक वरिष्ठ नागरिक आणि आणखी एक व्यक्ती असे 19 व्यक्ती होते त्यांची सुटका करण्यात आली आहे. आरोपीकडे एअर गन आणि केमिकल आढळून आले आहेत. आरोपी हा एकटाच होता त्याच्यासोबत कोणीही नव्हते असंही पोलिसांनी सांगितले.

रोहित आर्या हा पुण्यात राहणारा व्यक्ती आहे. दीपक केसरकर मंत्री असताना रोहित आर्या याला शिक्षण विभागाशी संबंधित एका शाळेच्या कामासाठीचे टेंडर मिळाले होते. शाळेच्या कामाचे पैसे अद्याप मिळाले नाहीत असा आरोप रोहित आर्याचा आहे. केसरकर मंत्री असतााना रोहित आर्या याच्याकडून केसरकर यांत्या निवासस्थानी अनेक आंदोलने करण्यात आली. मुलांना ओलीस का ठेवले? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोहित आर्या याने लहान मुलांना ओलीस का ठेवले याबाबतची निश्चित माहिती अद्याप समोर आलेली नाहीये पण याबाबत तपास आणि चौकशी सुरू आहे. लवकरच याबाबतची अधिक माहिती समोर येईल.

आरोपीची व्हिडिओमधून काय मागणी?

रोहित आर्य असं मुलांना ओलीस ठेवलेल्या आरोपीचं नाव असून माझ्या काही मागण्या आहेत. मी आत्महत्या करण्याऐवजी या मुलांना बंदी बनवलं आहे, असं रोहित आर्यने व्हिडिओच्या माध्यमातून म्हटलं आहे. मी दहशतवादी नाही, माझ्या काही साध्या मागण्या आहेत. मला संवाद साधायचा आहे, काही बोलायचं आहे, मला काही लोकांशी बोलायचं आहे, त्यांना प्रश्न विचारायचे आहेत असं रोहित आर्यने म्हटलं आहे.

ताज्या बातम्या