श्रीलंकेहून भारताकडे सरकणारे चक्रीवादळ महाराष्ट्रावरही परिणाम करणार अशी काहीशी शक्यता सध्या निर्माण झाली आहे. पुढील दोन दिवस राज्याच्या अनेक भागात ढगाळ वातावरण राहील. विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे, तर उर्वरित राज्यात थंडी वाढेल. त्यामुळे एकुणच दक्षिणेतील तामिळनाडू, आंध्र प्रदेशमध्ये सध्या पावसाची स्थिती आहे. यामुळे महाराष्ट्रात विदर्भ तसेच तेलंगणाच्या काही भागात तुरळक अशा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
Ditwah Cycloneचा पूर्व किनारपट्टीला फटका
पुढील 24 तासांमध्ये हे चक्रीवादळ तामिळनाडू आणि पाँडेचेरीच्या किनार पट्टीला समांतर उत्तर दिशेनं पुढे सरकरण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे किनारी भागात मोठं नुकसान होणार असल्याचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला असून चक्रीवादळ प्रभावित भागांमध्ये योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे.

चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा तामिळनाडूला बसणार आहे, तामिळनाडूच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार आहे, हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तामिळनाडू सोबतच आंध्र प्रदेश आणि पाँडेचेरीमध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. कर्नाटक राज्यात देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तामिळनाडूमध्ये चक्रीवादळ डिटवाहाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आली आहेत.
महाराष्ट्रातील विदर्भात नेमकी काय स्थिती?
महाराष्ट्रात या चक्रीवादळामुळे पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी तापमानात घसरण होऊन थंडीचा कडाका देखील वाढू शकतो. तर विदर्भातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र पाऊस पडला तरी त्याचा कोणताही मोठा प्रभाव जाणवण्याची शक्यता नाही. त्यामुळे एकुणच काय स्थिती राहते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.











