मुंबई, ठाणे, नवी मुंबईत सीएनजी मिळेना; पंपांवर गाड्यांच्या रांगा, नेमकं कारण काय?

Rohit Shinde

मुंबईतून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सीएनजी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. सीएनजी गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या बिघाडामुळेच सीएनजी पंपांवर सीएनजीचा पुरवठा होत नाहीये. परिणामी वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मुंबई शहर आणि परिसरात सीएनजीचं शॉर्टेज

रविवारी दुपारपासून सीएनजीच्या मुख्य पाईपलाईनला नुकसान झाल्यामुळे देशाची आर्थिक राजधानीत सीएनजी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. ओला आणि उबर सारख्या कंपन्यांद्वारे चालवल्या जाणाऱ्या बहुतेक कार, ऑटोरिक्षा आणि टॅक्सी तसेच सार्वजनिक वाहतूक कंपन्यांद्वारे चालवल्या जाणाऱ्या काही बसेस एमजीएलद्वारे पुरवल्या जाणाऱ्या कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) वर अवलंबून आहेत. पण आता सीएनजी पंपावर गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्याने सीएनजी पंपाबाहेर वाहनांच्या रांगा लागल्याचं पहायला मिळत आहे.

सीएनजी पुरवठा विस्कळीत होण्याचे कारण?

सीएनजी पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात सीएनजी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. गेलच्या मुख्य गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने त्याचा परिणाम सीएनजी पुरवठ्यावर झाला आहे. त्यामुळे सीएनजीवर धावणाऱ्या रिक्षा, टॅक्सी, बस आणि खासगी वाहनांना या टंचाईचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. असं असलं तरी घरगुती पीएनजी ग्राहकांना मात्र कोणत्याही व्यत्ययाशिवाय गॅस पुरवठा सुरू राहणार असल्याचं महानगर गॅस लिमिटेड कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात महानगर गॅस लिमिटेडकडून गॅसचा पुरवठा केला जातो. मात्र, आरसीएफ कंपाऊंडमधील गेलच्या मुख्य गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे वडाळा येथील MGLच्या सिटी गेट स्टेशनला होणारा सीएनजी गॅस पुरवठा प्रभावित झाला आहे. याचा फटका मुंबईत गॅस पुरवठ्यावर झाल्याचं पाहायला मिळतंय.

ताज्या बातम्या