राज्यात पुढील तीन दिवस शीतलहरीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याला शीत लहरीचा इशारा देण्यात आला आहे. 15 नोव्हेंबरला नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात कोल्ड वेव्हचा इशारा देण्यात आला आहे. एकूणच राज्यातील हवामान उद्या कसे असेल, थंडीची स्थिती काय असेल ते सविस्तर जाणून घेऊ…
15 नोव्हेंबरला कसं असेल हवामान ?
राज्यात थंडीने हुडहुडी भरलेली असताना मुंबईकरांना मात्र थंडीची प्रतीक्षा करावी लागत आहे. मुंबईत हलका गारवा जाणवत आहे. 15 नोव्हेंबरला मुंबई शहर आणि उपनगरात स्वच्छ आणि कोरडं हवामान पाहायला मिळेल. कोकणात देखील हीच स्थिती कायम राहील. तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस राहील. पुण्यात मुख्यतः स्वच्छ हवामान राहील. परंतु किमान तापमान 12 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस राहील. पुढील काही दिवसांत थंडी आणखी वाढणार आहे. कोल्हापूरमध्ये किमान तापमान 18 तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस इतके असेल.
उत्तर महाराष्ट्र थंडीच्या कडाक्याने गारठणार आहे. 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी जळगाव जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर 16 नोव्हेंबरला नाशिकला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. इथे तापमान 8 अंश सेल्सिअस एव्हढं नीचांकी असेल. मराठवाड्यातदेखील पुढील तीन दिवस शीतलहरी पहायला मिळणार. छत्रपती संभाजीनगरला 16 नोव्हेंबरला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर 15 नोव्हेंबरला 11 अंश सेल्सिअस एव्हढं किमान तापमान असेल.
विदर्भात थंडीचा कडाका कायम आहे. विदर्भातील प्रमुख शहरे नागपूर आणि अमरावतीत किमान तापमान 12 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता असून आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुढील तीन दिवसांत राज्यातील किमान तापमानात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी तापमान 7 ते 8 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येईल. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





