Cold Wave Alert: महाराष्ट्रात गारठा वाढला; आज सर्वदूर थंड आणि कोरडे हवामान राहण्याचा अंदाज

राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील लोकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रात देखील थंडीच्या लाटेचा जोर चांगलाच वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

महाराष्ट्रात पुन्हा एकदा तापमानात मोठी घसरण होण्यास सुरूवात झाली आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील थंडीचे प्रमाण कमी झाले होते. आता मात्र वातावरणात बदल जाणवत असून तापमानात घट होऊन गारठा वाढला आहे. हवामान विभागाकडून देखील थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच थंडीचा कडाका वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे किमान तापमानामध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. विशेषतः विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात सकाळची तीव्र थंडी पुन्हा परतली आहे. काही जिल्ह्यांत किमान तापमान एक अंकी पातळीच्या जवळ पोहोचत असून हिवाळ्याचा जोर अधिक जाणवू लागला आहे. आज 7 डिसेंबर रोजी मुंबई, कोकण किनारपट्टी, पुणे, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील हवामान कसे असेल ते जाणून घेऊ….

महाराष्ट्रातील हवामान कसे असेल ?

राज्यातील मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या भागांत आजचे हवामान एकूणात शांत आणि कोरडे राहणार आहे. विदर्भातील तीन जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सोलापूर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांत सकाळचे तापमान 12–15 अंशांच्या दरम्यान नोंदवले जाईल, तसेच काही भागांत तापमानात आणखी घट होऊ शकते. पुढील काही दिवस महाराष्ट्रातील हवामान स्थिर राहण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील तापमानात घट झाली आहे. या दोन्ही ठिकाणी तापमान 9 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. आता 7 डिसेंबरला नागपूर, गोंदिया आणि यवतमाळला शीत लहरींचा अलर्ट देण्यात आला आहे. राज्याच्या इतर भागात किमान तापमान 12 ते 15 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. एकुणच विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम-उत्तर महाराष्ट्रात थंडी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

मुंबईसह कोकणात काय परिस्थिती ?

मुंबईसह संपूर्ण कोकण पट्ट्यात थंडीचा तडाखा वाढलेला आहे. मुंबईत पहाटे हलका गारवा जाणवेल. शहराचे किमान तापमान अंदाजे 19 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 30 ते 31 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. पालघरमध्ये मुंबईपेक्षा जास्त थंडी असून तेथे तापमान 16 ते 18 अंशांच्या दरम्यान घसरण्याची शक्यता व्यक्त केली जाते. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत हवामान स्थिर असून किमान तापमान 17–19 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. दिवसा तापमान 30–32 अंशांच्या आसपास जाणार आहे. आकाश स्वच्छ, वारा मंद आणि संध्याकाळी पुन्हा गारवा अनुभवायला मिळेल.
ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण परिसरात आज हवामान शांत आणि कोरडे राहील. सकाळी हलकी थंडी जाणवेल. ठाणे आणि नवी मुंबईत किमान तापमान 18–19 अंश तर दिवसा 30–32 अंश राहण्याची शक्यता आहे. कल्याण–डोंबिवली परिसरात तापमान 16–18 अंशांपर्यंत खाली जात असल्याने सकाळी जास्त गारठा जाणवेल. मात्र दुपारी वातावरण उबदार आणि आनंददायी राहील. गेले दोन दिवस ढगाळ वातावरण असले तरी आज दिवसभर पावसाची शक्यता नाही.
पुणे आणि बारामती परिसरात हवामान कोरडे आणि स्थिर राहणार आहे. पुण्यातील किमान तापमान 15–17 अंशांच्या आसपास असून थंडीचा जोर तुलनेने कमी आहे. दिवसा तापमान 29–31 अंश राहील. काल-परवाच्या तुलनेत तापमानात फारसा बदल जाणवत नाही. दुपार उबदार जाणवेल तर सकाळचा गारवा सौम्य असेल.
सर्वदूर भयंकर थंडी पडणार !
संपूर्ण देशात हिवाळ्याला सुरुवात झाली असून काही ठिकाणी तापमानात मोठी घसरण पहायला मिळत आहे. राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील लोकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. अशातच आता हवामान विभागाने दिल्ली, पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि उत्तर प्रदेशसह उत्तर भारतातील इतर राज्यांना कडाक्याच्या थंडीचा इशारा दिला आहे. रविवारी म्हणजे उद्या हाडं गोठवणारी थंडी पडणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. या काळात राजधीनी दिल्ली-एनसीआरमध्ये किमान तापमान 3.9 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. तसेच काही दिवस दाट धुक्याची चादरही पहायला मिळण्याची शक्यता आहे.

About Author

Rohit Shinde

Other Latest News