यंदा महाराष्ट्रासह देशभरात विक्रमी थंडी जाणवण्याची शक्यता आहे. राज्यातील तापमानात सातत्याने घट होत आहे. पुढील काही दिवस उत्तर – पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील तापमानात मोठी घट होणार आहे. 16 नोव्हेंबर रोजी हवामान विभागाकडून शीतलहरीचा इशारा देण्यात आला आहे. आज मराठवाड्यातील 6 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला. त्यामुळे या भागात थंडीची लाट जाणवण्याची शक्यता आहे. अशीच काहीशी परिस्थिती उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात राहण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार !
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तापमान 9°C पर्यंत घसरला आहे. अशा परिस्थितीमध्ये हवामान विभागाकडून पुन्हा एकदा जबरदस्त अशा थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणीसह बीड जिल्ह्याला शीतलहरींचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस इतके राहू शकते. विदर्भातील काही जिल्ह्यांतही सध्या अशीच काहीशी परिस्थिती आहे.

पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांत देखील स्थिती भयंकर आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार या भागात तापमानात मोठी घसरण होताना दिसत आहे. उत्तरेकडील शीत वाऱ्यांचे प्रवाह महाराष्ट्रात येवू लागल्याने गारठा वाढला आहे. उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात थंडीची लाट असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील पारा घसरला आहे. पहाटे दाट धुके पसरत असून आजही हुडहुडी कायम आहे. पुणे ते सोलापूर पश्चिम महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांना थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
थंडी 25 वर्षांचे रेकॉर्ड मोडणार का ?
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत महाराष्ट्रासह देशाच्या पश्चिम आणि मध्य भागात किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील नागरिकांना थंडीचा स्पर्श लवकरच जाणवणार आहे. यावर्षी मागील 25 वर्षांच्या तुलनेत थंडी थोडी जास्त भासणार आहे. त्यामुळे यंदाचा पावसाळा जसा रेकॉर्डब्रेक ठरला अगदी त्याचप्रमाणे यंदाची थंडी देखील रेकॉर्ड ब्रेक ठरते का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
रब्बी हंगामाच्या कामाला वेग
महाराष्ट्रात हळूहळू वाढणारी थंडी आता स्पष्टपणे जाणवू लागली आहे. सकाळच्या आणि रात्रीच्या वेळी गारवा वाढल्याने शेतीसाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. या थंडीमुळे रब्बी हंगामाच्या पिकांची लागवड वेगाने सुरू झाली आहे. गहू, हरभरा, ज्वारी, मका आणि मोहरी यांसारख्या पिकांच्या पेरणीसाठी शेतकरी उत्साहाने काम करत आहेत. हवामान विभागाने पुढील काही दिवसांत तापमानात आणखी ३ ते ४ अंशांची घट होईल, असा अंदाज वर्तवला आहे.











