महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा मोठे बदल पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा तापमानात मोठी घसरण होण्यास सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रात नोव्हेंबर अखेर अचानक थंडीचा जोर वाढला आहे.मराठवाडा, विदर्भ, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील थंडीचे प्रमाण कमी झाले होते. आता मात्र वातावरणात बदल जाणवत असून तापमानात घट होऊन गारठा वाढला आहे. सर्वच जिल्ह्यांमध्ये थंडीचा जोर वाढला असून पुन्हा शेकोट्या पेटल्या आहेत. रविवारी महाराष्ट्राचा पारा आणखी घसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.त्यामुळे एकुणच परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
राज्यात थंडीचा जोर पुन्हा वाढणार !
राज्यातील तापमानाचा पारा 15 अंश सेल्सिअसपेक्षाही खाली आला आहे. त्यामुळे नागरिकांना पुन्हा एकदा थंडी अनुभवायला मिळत आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सकाळी धुके पहायला मिळेल. तर त्यानंतर आकाश स्वच्छ होईल. तर मुंबईतील कमाल तापमान 32 तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहील. कोकणातील अन्य जिल्ह्यांमध्ये देखील याच प्रकारचे हवामान पहायला मिळेल.

पश्चिम महाराष्ट्रात देखील थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. 30 नोव्हेंबर रोजी पुण्यात किमान तापमान 13 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. तर कोल्हापूरमध्ये सकाळी ढगाळ असलेले आकाश दुपारनंतर निरभ्र होईल. किमान तापमान 15 अंश सेल्सिअस राहील. उत्तर महाराष्ट्रात सकाळी दाट धुके पहायला मिळेल. यामुळे दृश्यमानता कमी होऊ शकते. तर नंतर आकाश निरभ्र राहील. किमान तापमान 15 अंश सेल्सिअस राहील. जळगावमध्ये 14 अंश सेल्सिअस एव्हढं किमान तापमान असेल.
विदर्भात अंशतः ढगाळ आकाशासह धुके पहायला मिळेल. त्याबरोबर गारठा देखील वाढणार आहे. नागपूरमध्ये कमाल तापमान 28 तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. उर्वरित जिल्ह्यांतील वातावरण देखील याच प्रकारे असेल. मराठवाड्यातील इतर सात जिल्ह्यांच्या तुलनेत लातूर जिल्ह्यात गारठा कमी असणार आहे.
त्यामुळे रविवारी लातूरमध्ये दिवसा तापमान अंदाजे 32.0 अंश, तर रात्री 23.0 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. धाराशिव जिल्ह्यात तापमानात घट होण्याची शक्यता आहे. तसेच आकाश निरभ्र राहील. बीड जिल्ह्यात कमाल तापमान 29.0 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17.1 अंश सेल्सिअस इतके राहील व सकाळ व संध्याकाळच्या वेळेला थंडी वाढण्याची शक्यता आहे. तसेच हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांत सामान्यतः आकाश निरभ्र असणार आहे. तसेच थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात थंडीत वाढ; आरोग्य जपा !
दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली आहे. आगामी काळात तापमानाचा पारा आणखी खाली येऊ शकतो. त्यामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. कडाक्याच्या थंडीत आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. थंड तापमानामुळे सर्दी, खोकला, ताप आणि सांधेदुखी यांसारख्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे शरीर उबदार राहील अशी कपडे घालणे, गरम पाणी पिणे आणि पौष्टिक आहार घेणे महत्त्वाचे आहे.
सकाळी कोमट पाण्याने अंघोळ करणे, वाफ घेणे आणि घरात पुरेशी हवेशीर व्यवस्था ठेवणे फायदेशीर ठरते. वृद्ध व्यक्ती, लहान मुले आणि अस्थमा किंवा हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी अतिरिक्त काळजी घ्यावी. व्यायाम करताना शरीरावर थंडीचा परिणाम होऊ नये म्हणून योग्य कपडे वापरावेत. पुरेसे पाणी पिणे आणि विश्रांती घेणेही आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.
थंडीत हृदयविकाराचा धोका वाढण्याची शक्यता अधिक असते. कारण, तापमान घटल्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्तदाब वाढतो. अशा परिस्थितीत हृदयावर अतिरिक्त ताण येतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. विशेषतः मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल वाढणे किंवा आधीपासून हृदयाचे विकार असलेल्या व्यक्तींनी खास काळजी घेणे आवश्यक आहे.











