व्यावसायिक सिलिंडर वापरणाऱ्यांसाठी थोडासा दिलासा मिळाला आहे. देशातील विविध शहरांमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 10 रुपयांची कपात करण्यात आली आहे. दिल्ली, पाटणा, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई या प्रमुख शहरांत सुधारित दर तत्काळ लागू झाले आहेत. मात्र, घरगुती वापरासाठी असलेल्या 14.2 किलो एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे घरगुती ग्राहकांना अद्याप जुन्याच दरात सिलिंडर घ्यावा लागणार आहे.
व्यावसायिक गॅस वापरकर्त्यांना दिलासा
१ डिसेंबरपासून वर्षाच्या शेवटच्या महिन्याची सुरुवात झाली आहे. नेहमीप्रमाणेच, महिन्याच्या पहिल्या तारखेला अनेक नियमांमधून काही बदल लागू झाले आहेत. दरवेळी प्रमाणे महिन्याच्या सुरुवातीलाच LPG गॅस सिलिंडरचे दर बदलले आहेत. त्याचा थेट परिणाम लोकांवर होणार आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेऊन त्यात सुधारणा करतात. आज, १ डिसेंबर रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंड आणि घरगुती सिलिंडर या दोन्हींचे दर अपडेट झाले आहेत.

व्यावसायिक सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दिल्लीपासून ते पाटणापर्यंत व्यावसायिक सिलिंडरच्या किमतींमध्ये 10 रुपयांची कपात करण्यात आली आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात झाल्यामुळे आता विविध शहरांमध्ये सुधारित दर लागू झाले आहेत. दिल्लीमध्ये १९ किलोचा एलपीजी सिलिंडर पूर्वी १५९०.५० रुपयांना मिळत होता, तो आता १५८०.५० रुपयांना उपलब्ध होईल. कोलकातामध्ये सिलेंडर १६९४ रुपयांना मिळत होता तो या महिन्यात १६८४ रुपयांना मिळेल.
कोणत्या शहरात नेमका काय दर ?
मुंबईत व्यावसायिक सिलिंडरसाठी नागरिकांना १५४२ रुपये मोजावे लागत होते ते आता या महिन्यापासून १५३१.५० रुपये मोजावे लागतील. चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलिंडर १७५० रुपयांवरून १७३९.५० रुपयांना उपलब्ध होईल. व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत बदल झाला असला तरी, घरगुती वापराच्या १४.२ किलो सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
इंडियन ऑईलच्या आकडेवारीनुसार, घरगुती सिलिंडरचे दर आहेत तेच आहेत. दिल्लीत १४.२ किलोचा घरगुती सिलिंडर सध्या ८५३ रुपयांना मिळत आहे. मुंबईत तो ८५२.५० रुपयांना उपलब्ध आहे. लखनऊमध्ये ८९०.५० रुपये तर कारगिलमध्ये ९८५.५ रुपये आणि पुलवामामध्ये ९६९ रुपये इतका दर आहे.
एलपीजी सिलिंडरची किंमत ठरवण्यामागे एक निश्चित प्रक्रिया असते. यात आयात समानता किंमत विचारात घेतली जाते. यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दर, डॉलर-रुपया विनिमय दर, वाहतूक खर्च आणि कर यांसारख्या घटकांचा समावेश असतो. प्रत्येक राज्यात स्थानिक कर आणि लॉजिस्टिक्स खर्चांमुळे किमतींमध्ये फरक आढळतो. याशिवाय, सरकारकडून दिली जाणारी सबसिडी (उदा. उज्ज्वला योजना) थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते, ज्यामुळे पात्र ग्राहकांचा खर्च कमी होतो.











