कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर सरकारचा सावध पवित्रा; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा!

मराठा कुणबी प्रमाणपत्रांच्या वाटपात अनेक बाबी संशयास्पद असल्याचे ओबीसी नेते सातत्याने म्हणत आहेत. आता त्यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी मोठा निर्णय घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील चांगलेच आक्रमक झाले आहेत.

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप सुरू झाल्यानंतर ओबीसी नेते आणि ओबीसी समाजात मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारे मराठे आरक्षणात जात असल्याचा आरोप देखील सातत्याने करण्यात येत आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यात आला असून, बनावट प्रमाणपत्रे देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांनाच जबाबदार धरले जाईल, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती महसूलमंत्री व ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. 

सरकारची ओबीसी शिष्टमंडळासोबत महत्वाची बैठक

ओबीसी शिष्टमंडळासोबत सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, पर्यावरण आणि वातावरण बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, इतर मागास व बहुजन कल्याण  दुग्धविकास मंत्री अतुल सावे, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि ओबीसी संघटनांचे सुमारे ४० प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीनंतर महसूलमंत्री बावनकुळे यांनी माध्यमांना माहिती दिली.

बनावट प्रमाणपत्रे देऊ नका; बावनकुळेंच्या सूचना

बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले, “मराठा-कुणबी प्रमाणपत्राच्या जीआरचा कुणीही गैरफायदा घेऊ नये व बनावट प्रमाणपत्रे दिली जाऊ नयेत, यावर सरकार आणि शिष्टमंडळ यांचे एकमत झाले आहे. बैठकीत मंत्री छगन भुजबळ यांनी काही अधिकाऱ्यांनी खोटे दाखले दिल्याचे पुरावे सादर केले. यावर, ‘जर एखाद्या अधिकाऱ्याने खोटे प्रमाणपत्र दिले, तर त्याला तो अधिकारीच जबाबदार असेल आणि त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल,’ असे मुख्यमंत्र्यांनी निक्षून सांगितले आहे.

मनोज जरांगे पाटील आक्रमक भूमिकेत; सरकारला इशारा

कुठलंही खोटं प्रमाणपत्र काढल्यास किंवा चुकीचे प्रमाणपत्र दिल्यास अधिकारी जबाबदार राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, ओबीसींच्या ताटातला कुणी घेणार नाही आणि ओबीसी मराठा समाजात कुठलाही संघर्ष निर्माण होणार नाही याची काळजी शासन घेईल, अशी ग्वाही देण्यात आली आहे. यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  २०१४ पासून मराठ्यांना किती कुणबी प्रमाणपत्रे दिली, याची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी जरांगेंनी केली. बावनकुळे मराठा नेते, उद्योगपती आणि अधिकाऱ्यांच्या मागे लागले असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला आहे. बोगस आरक्षण खाणाऱ्यांना बावनकुळे पाठिशी घालू लागल्याचेही ते म्हणाले. मराठ्यांनी सुद्धा बोगस जाती बाहेर काढण्याची मागणी केली आहे. जर आता नीट झाले नाही तर अनेकांना बाहेर काढू, असा इशाराही जरांगे यांनी दिला आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News