नवी दिल्ली – ठाकरे बंधूंना पटक पटक के मारेंगे अशी धमकी ज्या भाजपा खासदार निशिकांत दुबेंनी दिली होती. त्याच निशिकांत दुबेंची भर संसद भवनात पळता भूई थोडी झाली यामागचं कारण म्हणजे महाराष्ट्रातील काँग्रेसच्या महिला खासदार वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर आणि शोभा बच्छाव यांनी त्यांना मराठी इंगा दाखवला.
या तिघा रणरागिणींनी निशिकांत दुबेंना संसदेच्या लॉबीत घेरत जाब विचारला. त्यामुळं घाबरलेल्या दुबेंनी ‘जय महाराष्ट्र’ म्हणत तिथून काढता पाय घेतला
संसदेच्या लॉबीत नेमकं काय घडलं?
महाराष्ट्रातील खासदार निशिकांत दुबेंना शोधत होते. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाडांना खासदार मनोज तिवारी दिसले.गायकवाडांनी दुबेंबाबत तिवारींकडे विचारणा केली. इतक्यात निशिकांत दुबे मराठी खासदारांच्या दिशेनं आले. वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर, शोभा बच्छाव या तिघा काँग्रेस खासदारांनी त्यांना घेरलं.’महाराष्ट्राच्या विरोधात अपमानजनक विधान का केलं? कुणाकुणाला पटक पटक के मारणार आहात?’, असा सवाल तिघा महिला खासदारांनी दुबेंना केला.
महिला खासदारांचा रुद्रावतार पाहून निशिकांत दुबे पूर्णपणे भांबावले. भेदरलेल्या स्वरात ‘नाही… नाही… तसं काही नाही,’ अशी सारवासारव दुबेंनी केली. वर्षा गायकवाड यांनी त्यांचा हात धरला आणि ‘जय महाराष्ट्र’ म्हणायला सांगितलं. अखेर दुबेंनी हात जोडत ‘जय महाराष्ट्र’ अशी घोषणा दिली.आणि गर्दीतून वाट काढत दुबे निघून गेले.
दुबेंना कळाली मराठी माणसाची ताकद
हिंदी भाषेविरोधात उद्धव आणि राज ठाकरेंनी विजयी मेळावा घेत मराठी माणसाची एकजूट देशाला दाखवून दिली. त्यामुळं भाजपा खासदार निशिकांत दुबेंनी ठाकरे बंधूंना महाराष्ट्र बाहेर या असं आव्हान देत तुम्हाला पटकून पटकून मारु असा इशारा दिला होता . इतकच नव्हे तर मराठी लोक आमच्या पैशांवर जगताय असे अकलेचे तारे तोडत निशिकांत दुबेंनी महाराष्ट्राच्या कर्तृत्वाविषयी गरळ ओकली.
त्यामुळं संसदेच्या लॉबीत महिला मराठी खासदारांनी एकजुटीमुळे निशिकांत दुबेंना आपली ताकद दाखवून दिली
मनसे करणार सत्कार
महिला मराठी खासदारांच्या आक्रमक भूमिकेमुळे निशिकांत दुबेंना आपल्या वक्तव्यावरून बॅकफूटवर जावं लागलं. मात्र जे महाराष्ट्रातील सर्वपक्षीय पुरुष खासदारांना जमलं नाही, ते महिला खासदारांनी करुन दाखवलंय. त्यामुळं आता या तिन्ही महिला खासदारांचा मनसेकडून सत्कार करण्यात येणार आहे
भाजपा खासदार निशिकांत दुबे मराठी माणसाला डिवचणारी वक्तव्य सातत्यानं करताय. त्यामुळं या दुबेंना काँग्रेसच्या महिला खासदारांनी पहिला धडा दिलाय. आता मविआचे खासदार देखील निशिकांत दुबेंना प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे





