मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याला सार्वजनिक ठिकाणी चापट मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याच्या प्रकरणात माजी आमदार गीता जैन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दाखल केलेल्या अर्जावर न्यायालयाने हा आदेश दिला असून, काशीमिरा पोलिसांना भारतीय दंड संहितेच्या कलम 323, 352, 353, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा नोंदविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नेमकं प्रकरण आहे तरी काय?
ऐन निवडणुकांच्या काळात मिरा-भाईंदरच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. शहराच्या माजी आमदार आणि माजी महापौर गीता जैन यांच्या विरोधात ठाणे न्यायालयाने सरकारी कामात अडथळा आणणे आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

16 जून 2023 रोजी मिरा रोडच्या पेणकर पाडा परिसरात मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली होती. या कारवाईच्या दुसऱ्या दिवशी माजी आमदार गीता जैन त्या ठिकाणी पाहणीसाठी गेल्या असता, त्यांचा महापालिकेच्या एका अभियंत्याशी वाद झाला. मनपा अभियंत्याने तक्रारीत नमूद केले होते की, गीता जैन यांनी “हसल्याबद्दल” मनपा शर्टाची कॉलर पकडून कानशिलात लगावली. घटनेनंतर अभियंत्याने पोलिसांत तक्रार दाखल केली होती, परंतु काही दिवसांनी ती मागे घेतली.
आपची तक्रार आणि आता गुन्हा…
तक्रार मागे घेतली असली तरी आम आदमी पक्षाचे ब्रिजेश शर्मा यांनी या प्रकरणात ठाणे न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यावर सुनावणीदरम्यान न्यायालयाने स्पष्ट केलं की,“कर्मचारी सरकारी सेवेत असल्यास, केवळ पीडिताच नव्हे तर इतरांनाही तक्रार दाखल करण्याचा अधिकार आहे. या निरीक्षणानंतर न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम 353(सरकारी कामात अडथळा आणणे) आणि संबंधित कलमांखालीगीता जैन यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशानंतर प्रतिक्रिया देताना गीता जैन यांनी सांगितले की, “आमच्यावर राजकीय हेतूने कारवाई सुरू आहे. आम्हाला या आदेशाला स्थगिती मिळाली आहे.”त्या म्हणाल्या की, हे संपूर्ण प्रकरण विरोधकांनी हेतूपुरस्सर पुढे आणले आहे.दरम्यान, न्यायालयात पुढील सुनावणीदरम्यानच या प्रकरणाचा अंतिम निर्णय स्पष्ट होईल.











