लहान मुलींवर वाढत्या अत्याचारांच्या घटना हा समाजासाठी अत्यंत गंभीर आणि चिंताजनक विषय बनला आहे. तंत्रज्ञानाचा गैरवापर, सामाजिक असुरक्षितता, नैतिक मूल्यांतील अधोगती, पालकांचे कमी लक्ष आणि कायद्याविषयी भीतीचा अभाव यामुळे या घटना सातत्याने वाढताना दिसतात. घर, शाळा, नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्तींमधूनही धोका वाढत असल्याने परिस्थिती अधिकच भयावह होत आहे. मालेगावातून आता एका अत्यंत धक्कादायक अशा घटनेचा उलगडा झाला आहे.
13 वर्षीय मुलीवर वृध्द नागरिकाचे अत्याचार
मालेगावमध्ये एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. एका ६० वर्षीय वृद्धाने १३ वर्षीय मानसिक रुग्ण मुलीवर बलात्कार केला. एका ६० वर्षीय वृद्धाने १३ वर्षीय मानसिक रुग्ण मुलीवर बलात्कार केला, ज्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली. आरोपीचे नाव दीपक धनराज छाजेड असे आहे, जो वैद्यकीय व्यवसायी आहे. ही घटना मंगळवार, २५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता घडली. संशयिताने पीडितेला तिच्या घरामागे खेळताना पाहिले आणि तिच्या दुचाकीवरून तिचे अपहरण केले. तो तिला सटाणा रोडवरील वैद्य रुग्णालयाजवळील एका निर्जन परिसरात घेऊन गेला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

आरोपी अटकेत; कठोर कारवाईची मागणी
छावणी पोलिस ठाण्यात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे न्यायाधीशांनी २९ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. संबंधित आरोपी आता पोलिसांच्या अटकेत असून त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी आता नागरिकांमधून होताना दिसत आहे. मालेगावच्या डोंगराळे गावातील घटना ताजी असताना ही अशी एक घटना घडली असल्याने गुन्हेगारांमध्ये काही भीती उरलीय की नाही, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.