राज्यातील महिला आणि तरुणींवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. लैंगिक छळ, बलात्कार, छेडछाड आणि कौटुंबिक हिंसाचार यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकार आणि पोलीस यंत्रणेने कठोर पावले उचलून दोषींना शिक्षा दिली पाहिजे, तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना गरजेच्या आहेत. अशा या संपूर्ण परिस्थितीमध्ये परभणीमधून मात्र धक्कादायक असा प्रकार उघडकीस आला आहे. कारण, एका तरूणीवर अज्ञात स्थळी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
तरूणीवर अत्याचार; आरोपींना बेड्या
परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात ऐन दिवाळी सणाच्या काही दिवस अगोदर तरुणीवर सामूहिक अत्याचाराची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका झाडाखाली आपल्या प्रियकर मित्रासोबत गप्पा मारत बसलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी, पोलिसांनी आरोपींना अटक केल्याची माहिती पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली. तसेच, जिथे कोणी जात नाही तिथे तरुण-तरुणींनी जाऊ नये, असा सल्लादेखील पालकमंत्र्यांनी दिला आहे.
जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी संस्थान इटोली परिसरात 14 ऑक्टोबर रोजी एका गंभीर आणि संतापजनक घटनेची नोंद झाली आहे. या घटनेने संपूर्ण परभणी जिल्हा सुन्न झाला असून झाडाखाली गप्पा मारत बसलेल्या तरुणीजवळ अचानक 6 जण आले अन् तिच्यासोबत असलेल्या तरुणाला पकडून ठेवलं. त्यातील 3 जणांनी तरुणीवर सामूहिक अत्याचार केला व या घटनेचा व्हिडिओ देखील चित्रित केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत 6 नराधमांना अटक केली आहे.

महिला, तरूणींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर
राज्यात महिला आणि तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. सार्वजनिक ठिकाणी, शैक्षणिक संस्थांमध्ये आणि कार्यस्थळांवर होणाऱ्या छेडछाडीच्या आणि अत्याचारांच्या घटना वाढल्या आहेत. महिलांना सुरक्षित वातावरण देणे ही समाजाची आणि शासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. पोलिस यंत्रणेला अधिक सक्षम करणे, सीसीटीव्ही व्यवस्था वाढवणे, तसेच महिलांसाठी त्वरित मदत मिळवून देणाऱ्या हेल्पलाइनचा प्रचार करणे आवश्यक आहे. शिक्षणातून महिला सक्षमीकरण घडवणे आणि लहान वयापासून मुलांमध्ये स्त्री-पुरुष समानतेचे संस्कार रुजवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने महिलांच्या सुरक्षेसाठी जागरूक राहणे गरजेचे आहे.











