महाराष्ट्रावरील आस्मानी संकट कायम; अनेक जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता

Rohit Shinde

गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने नागरिकांचे हाल होत आहे. तर दुसरीकडे आता पुन्हा एकदा राज्यात आस्मानी संकट येण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यात पुढील 4 ते 5 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागत पुढील 4 ते 5 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आज कोणत्या जिल्ह्यांसाठी अलर्ट ?

मुंबई शहर आणि उपनगरात अंशतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता असून अधूनमधून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.  कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याला 5 तारखेसाठी यलो अलर्ट तर सहा तारखेला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्याला हवामान विभागाने 5 नोव्हेंबरसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. पुणे वगळता चारही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आज रत्नागिरी ,सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरमध्ये आज वादळी पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. तर धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांमध्ये विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात पुढील दोन ते तीन दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यामध्येही तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्यातील नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित परभणी, बीड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भामध्ये मात्र पावसाने काढता पाय घेतला आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसासाठी कोणताही इशारा दिलेला नसून सामान्यतः कोरडे हवामान पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

7 नोव्हेंबरनंतर पावसाची उघडीप?

नोव्हेंबर महिना उजाडला तरी राज्यात थंडीचा काही नामोनिशाण दिसत नाहीये. येता जात पडणाऱ्या पावसामुळे सामान्य नागरिक हैराण झाले असून मोठा त्रास सहन करावा लागत आहे. राज्यात थंडीची चाहूल सहा नोव्हेंबरनंतरच लागेल . अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील काही ठिकाणी 7 नोव्हेंबरपर्यंत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 7 ते 8 नोव्हेंबरनंतर हवामान कोरडे होऊन थंडीची चाहूल लागण्याचा अंदाज हवामाना तज्ञांनी वर्तवला आहे. त्यामुळे राज्यातील पाऊस खऱ्या अर्थाने 7 नोव्हेंबरनंतरच उघडीप घेईल, अशी शक्यता निर्माण झालेली आहे.

शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता

दरम्यान नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या या पावसामुळे कापणी झालेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच, या अवकाळी पावसामुळे थंडी लांबली असून ढगाळ वातावरणामुळे लोकांना काहीसा घाम फुटू लागला आहे. मराठवाड्यात कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे. अशात पावसाने हजेरी लावल्यास शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या