कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढपुरात भाविकांची गर्दी; दर्शनासाठी रांगेत 15 तासांची प्रतिक्षा ?

कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात भक्तांची गर्दी पाहायला मिळत आहे. दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली आहे. 'दर्शनाला पंधरा ते अठरा तास एवढा वेळ लागतोय', तरीही भाविकांचा उत्साह कमी झालेला नाही.

कार्तिक एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढपुरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून पंढरपुरात भाविक येत असतात. प्रशासनाकडून संपूर्ण चोख तयारी करण्यात आली आहे. तरी देखील भक्तांना काही तास रांगेत उभे राहावे लागत आहे.

पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी

श्री क्षेत्र पंढरपूर येथे 02 नोव्हेंबरला पार पडणाऱ्या कार्तिकी एकादशीमुळे उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेसाठी हजारो भाविक दाखल झाले असून विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली आहे. ‘दर्शनाला पंधरा ते अठरा तास एवढा वेळ लागतोय’, तरीही भाविकांचा उत्साह कमी झालेला नाही. देवाच्या दर्शनाची रांग गोपाळपूर येथील नवव्या पत्राशेडपर्यंत पोहोचली असून, लहान मुलांसह भाविक मोठ्या संख्येने दर्शन रांगेत उभे आहेत.

प्रशासनाने एकूण चौदा पत्राशेड उभारले आहेत. कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर, भाविकांच्या सोयीसाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने 24 तास दर्शन खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा अखंड दर्शन सोहळा प्रक्षाळपूजेपर्यंत सुरू राहणार आहे. दर्शनाला लागणारा मोठा वेळ पाहता, प्रत्येक भाविकाला देवाचे दर्शन मिळावे यासाठी प्रशासन आणि मंदिर समिती प्रयत्नशील आहे.

कार्तिकी यात्रेसाठी जादा बसेस 

यंदा श्रीक्षेत्र पंढरपूर येथे 2 नोव्हेंबर रोजी संपन्न होणाऱ्या कार्तिकी एकादशी यात्रेसाठी भाविक- प्रवाशांच्या सोयीकरता राज्यभरातून एसटी महामंडळ तब्बल 1150 जादा बसेस सोडण्याची तयारी केली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. पंढरपूर येथील एसटी महामंडळाच्या ‘ चंद्रभागा ‘ या यात्रा बसस्थानकावरून दिनांक 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त जादा बस वाहतूक केली जाणार आहे.

36 विशेष रेल्वे चालवल्या जाणार

मध्य रेल्वेने याबद्दल प्रसिद्धीपत्रक जारी केले असून यामध्ये विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. पंढरपूर येथे भरणाऱ्या कार्तिकी वारीला येणाऱ्या वारकऱ्यांचा प्रवास सुलभ करण्यासाठी ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत मिरज-लातूर आणि सोलापूर-मिरज दरम्यान विशेष गाड्यांची सेवा देण्यात येणार असल्याचे या प्रसिद्धीपत्रकाच्या निवेदनात म्हटले आहे. तसेच ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२५ दरम्यान एकूण ३६ विशेष रेल्वे फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.


About Author

Rohit Shinde

Other Latest News