मोंथा चक्रीवादळामुळे पुढील 24 तासांत राज्यात पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

मोंथा चक्रीवादळाने बंगालच्या उपसागरात आणि पूर्व किनारपट्टीवर उग्र रूप धारण केले आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्यावरील पावसाचे संकट आणखी गडद झाले आहे. हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आता राज्यभर पुन्हा एकदा मोंथा या चक्रीवादळामुळे पावसाचे संकट घोंगावत आहे. बंगालच्या उपसागरामध्ये मोंथा हे चक्रीवादळ सक्रिय झालं आहे. ज्यामुळे अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. परिणामी पुढील 24 तासांत राज्यभरात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे चक्रीवादळ 28 ऑक्टोबरला आंध्र प्रदेशच्या काकीनाडा किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता आहे.

24 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज

महाराष्ट्रात ऑक्टोबरच्या शेवटीही पावसाची तीव्रता ओसरलेली नाही. आज कोकण पट्ट्यातील मुंबईसह सर्व जिल्ह्यांसाठी हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने आज, 28 ऑक्टोबर रोजी यलो अलर्ट जारी केला आहे.

गेल्या आठवड्यापासून पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. आजही ग्रामीण भागांमध्ये सकाळपासूनच रिमझिम सरी सुरू झाल्या असून काही ठिकाणी जोरदार पावसाचा अनुभव आला आहे. हवेत आर्द्रता वाढली असून तापमानात किंचित घट नोंदवली गेली आहे.

राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नाशिक घाट, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट, कोल्हापूर, कोल्हापूर घाट, सातारा, सातारा घाट, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्याला मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

29 ऑक्टोबरनंतर पावसाची पूर्णपणे उघडीप ?

दरम्यान महाराष्ट्रातील पाऊस 29 ऑक्टोबरनंतर पूर्णपणे उघडीप देईल, असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे. 25 ते 29 ऑक्टोबरच्या दरम्यानच्या काळात राज्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस बरसण्याच्या अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.  तामिळनाडू, केरळ आणि दक्षिण भारतात 25 ते 28 ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या भागात रेड आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, त्याचा परिणाम परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर होणार आहे.

रब्बी हंगामावर संकट, शेतकरी चिंतेत

सततच्या पावसाळी आणि ढगाळ वातावरणामुळे राज्यातील रब्बीचा हंगाम देखील मागास होण्याची चिन्हे सध्या दिसत आहेत. दरम्यान नैऋत्य मान्सून राज्यातून पूर्णपणे माघारी फिरला आहे. तयार झालेल्या पोषक हवामानामुळे राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये हलक्यातील मध्यम सरींची शक्यता हवामाना विभाग आणि आगामी काळामध्ये वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेती कामाचे नियोजन करावे असं आवाहन देखील करण्यात आला आहे. शेतकरी सध्या चिंतेत आहेत.


About Author

Rohit Shinde

Other Latest News