MP Breaking News
Sat, Dec 13, 2025

नवी मुंबई विमानतळावरून बंगळुरू आणि दिल्लीसाठी रोज विमानसेवा; कधी सुरू होणार? तारीख जाणून घ्या!

Written by:Rohit Shinde
25 डिसेंबरपासून नवी मुंबई विमानतळ सुरू होणार आहे. देशातील प्रमुख शहरांसाठी या विमानतळावरून विमानांचं उड्डाण केले जाणार आहे. अधिक जाणून घेऊ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 ऑक्टोबर रोजी विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. सुमारे ₹19,650 कोटी खर्चून बांधलेले, एक धावपट्टी आणि मोठे टर्मिनल असलेले हे अत्याधुनिक विमानतळ दरवर्षी अंदाजे 2 कोटी प्रवाशांना हाताळण्याची क्षमता आहे. नवीन विमानतळामुळे मुंबई महानगर प्रदेशातील हवाई वाहतूक कोंडी कमी होईल अशी अपेक्षा आहे. एयर इंडिया एक्सप्रेसच्या फ्लाईट्स देशातील प्रमुख शहरांसाठी आकाशात झेपावणार आहेत. त्यामध्ये खरंतर दिल्ली आणि बंगळुरू या शहरांसाठी डेली सर्व्हिस असेल, अशी माहिती समोर येत आहे.

बंगळुरू आणि दिल्लीसाठी दररोज विमानसेवा

आकाशात विमान झेपावण्यासाठी अखेर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) सज्ज झालेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 25 डिसेंबरपासून विमानतळावरून विमान आकाशात झेपावणार आहे. ज्यासाठी एअर इंडिया एक्सप्रेसने बुकिंग देखील सुरू केली आहे. एअर इंडिया एक्सप्रेसकडून नवी मुंबई ते बेंगळुरू दिवसाला एक विमानाचं उड्डाण आणि दिल्लीला आठवड्यातून पाच उड्डाणे चालवले जाणार आहे. १ जानेवारीपासून, दोन्ही मार्गांवरील विमानाच्या फेऱ्या दुप्पट केल्या जाण्याच्या शक्यता आहे. बेंगळुरू आणि दिल्ली दरम्यान दररोज दोन उड्डाणे उपलब्ध असतील.

नवी मुंबईहून पहिली विमान सेवा सकाळी 08:55 वाजता बेंगळुरूसाठी निघेल, तर बेंगळुरूहून पहिली परतीचं उड्डाण सकाळी 08:10 वाजता निघेल. दिल्लीची सेवा वर्षाच्या अखेरीपर्यंत मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी अशा दिवशी चालणार आहे. तर, जानेवारी 2026 पासून दररोज सुरू होणार आहे. एअर इंडिया एक्सप्रेसचे व्यवस्थापकीय संचालक आलोक सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, “नवी मुंबई विमानतळ उघडण्याच्या पहिल्या दिवसापासून उड्डाणे सुरू करण्यास आम्ही उत्सुक आहोत. मुंबई आणि त्याच्या पाणलोट क्षेत्रासाठी क्षमता वाढवत, भारतातील सर्वात मोठ्या वाहतूक केंद्रांपैकी एक असलेल्या विमानतळासोबत काम करताना आम्हाला आनंद होत आहे.” टाटा-समूहाची ही विमान कंपनी सध्या मुंबईतून दर आठवड्याला 130 हून अधिक उड्डाणे चालवते.

प्रवाशांसाठी अनेक सोयी आणि सुविधा

विमानतळाची क्षमता दरवर्षी २ कोटी प्रवाशांना हाताळण्याची असेल. इंडिगो, अकासा एअर आणि एअर इंडिया एक्सप्रेस सारख्या अनेक एअरलाइन सहयोगी कंपन्यांनी नवी मुंबई विमानतळावरून देशांतर्गत उड्डाणे चालविण्यास रस दर्शविला आहे.  देशांतर्गत उड्डाणे सुरू झाल्यानंतर काही महिन्यांनी, तात्पुरत्या स्वरूपात २०२६ च्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होण्याची शक्यता आहे.

  • नवी मुंबई विमानतळाचे बांधकाम पाच टप्प्यात करण्याचे नियोजन आहे. अधिकाऱ्यांच्या मते, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची अंतिम क्षमता दरवर्षी ९० दशलक्ष प्रवाशांची असेल.
  • विमानतळावर अति-जलद सामान हाताळणी प्रणालीचे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य असेल. वाढीव वेग आणि अचूकतेसाठी ही प्रणाली ३६०-अंश बारकोड स्कॅनिंग वापरेल.
  • सामान्य माल, औषध आणि नाशवंत वस्तूंसाठी एक नवीन विशेष एअर कार्गो टर्मिनल बांधले जात आहे. टर्मिनलमध्ये तापमान-नियंत्रित गोदामे आणि उच्च-तंत्रज्ञान स्वयंचलित हाताळणी प्रणालींचा समावेश असेल, ज्यामुळे एनएमआयए पश्चिम आणि मध्य भारतासाठी एक प्रमुख मालवाहतूक प्रवेशद्वार बनेल.