मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुरू असलेल्या महिलांच्या ई-केवायसी प्रक्रियेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. तथापि, अलीकडील काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे तसेच लाभार्थी महिलांकडून आलेल्या विविध अडचणींमुळे सरकारला ही प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ई-केवायसीसाठी दिलेली अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. या आधी 18 नोव्हेंबर 2025 ही निश्चित केलेली अंतिम तारीख होती, मात्र आता ती 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता या संदर्भातील ई-केवायसी प्रक्रिया आणि त्यामधील दुरूस्ती यासाठी 31 डिसेंबर ही अंतिम मुदत ठरविण्यात आली आहे.
e-KYC / दुरूस्तीसाठी 31 डिसेंबरची मुदत
ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे. आतापर्यंत अनेक महिलांनी आपली ई-केवायसी पूर्ण केली आहे. मात्र, ई-केवायसी करताना काहींनी चुकीची माहिती भरल्याने त्यात दुरुस्तीची आवश्यकता आहे. तुम्हाला सुद्धा केवायसीमध्ये दुरुस्ती करायची असेल तर काळजी करू नका. कारण, तुम्हाला केवायसीमध्ये दुरुस्ती करण्याची एक शेवटची संधी उपलब्ध झाली आहे. या संदर्भात मंत्री अदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट करुन माहिती दिली आहे.
e-KYC दुरुस्तीसाठी मिळणार एकच संधी !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी या दुर्गम, ग्रामीण भागातील आहेत. e-KYC प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून काही चूक होणे स्वाभाविक आहे. या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी अशा आशयाची अनेक निवेदने विभागास प्राप्त झाली… pic.twitter.com/nT4Pw6E2QP
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) December 13, 2025
मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलं, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी या दुर्गम, ग्रामीण भागातील आहेत. e-KYC प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून काही चूक होणे स्वाभाविक आहे. या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी अशा आशयाची अनेक निवेदने विभागास प्राप्त झाली आहेत. सदर योजना ही महिला सक्षमीकरणाच्या हेतूने राबविण्यात येत आहे, म्हणूनच या महिलांना e-KYC करताना झालेली चूक सुधारण्याची संधी देणे अत्यंत गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन e-KYC मध्ये केवळ एकदाच सुधारणा करण्याची अंतिम संधी 31 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात येत आहे असंही मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.
बहिणींनो, ई-केवायसी पूर्ण करून घ्या!
योजनेतील महिला लाभार्थ्यांसाठी आता एक मोठा बदल करण्यात आला आहे. केवळ लाभार्थी महिलेचेच नाही, तर त्या महिलेचे पती किंवा वडिलांचे ई-केवायसी (e-KYC) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नव्या नियमानुसार, सरकार आता लाभार्थी महिलेच्या उत्पन्नासोबतच तिच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न पडताळून पाहणार आहे.
- लाभार्थी महिलांना https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेब पोर्टलवर जाऊन ई-केवायसी करायची आहे.
- संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्हाला तुमची काही महत्त्वाची कागदपत्रे आणि माहिती पुन्हा अपलोड करावी लागेल.
- तुमचे नाव, पत्ता, शिधापत्रिका (रेशन कार्ड) क्रमांक, उत्पन्नाची माहिती आणि आधार कार्डची माहिती यांचा समावेश असेल. प्रोसेस पूर्ण होईल.
यामध्ये विवाहीत महिलांना आपल्या पतीची आणि मुलींना आपल्या वडिलांची ई-केवायसी देखील करून घ्यावी लागणार आहे. निर्धारीत मुदतीमध्ये प्रक्रिया पार पाडावी लागेल.





