आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ओला दुष्काळ जाहीर करा, विरोधकांची मागणी

राज्यातील शेतकरी मोठ्या आशेने त्याच्यासाठी होणाऱ्या निर्णयाची आस लावून बसला आहे. सरकारने आता तरी वेळ न घालवता ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरघोस मदत द्यावी. लोकांची घरे कोसळली आहेत, जनावरे वाहून गेली आहेत.

Marathwada Flood – अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील जनजीवन विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे नद्या आणि ओढे तुडुंब भरून वाहू लागले. परिणामी, गावोगावी पूरस्थिती निर्माण झाली आणि अनेक कुटुंबांचे घरदार वाहून गेले. या आपत्तीत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे. शेतकऱ्यांना तर या अतिवृष्टीने मोठा फटका बसला आहे. शेतमाल पाण्याखाली गेला, उभी पिके नष्ट झाली आणि मातीची धूप झाल्याने शेतजमिनींचे मोठे नुकसान झाले. यामुळं सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे.

सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा

आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीकडे राज्यातील शेतकरी मोठ्या आशेने त्याच्यासाठी होणाऱ्या निर्णयाची आस लावून बसला आहे. सरकारने आता तरी वेळ न घालवता ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरघोस मदत द्यावी. लोकांची घरे कोसळली आहेत, जनावरे वाहून गेली आहेत. त्यामुळे बाधितांना तातडीने मदत मिळणे अत्यावश्यक आहे. सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा देणारे ठोस निर्णय घ्यावेत. अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. म्हणूनच त्यांना लवकर पुन्हा उभं करण्यासाठी दिवाळीपूर्वीच भरीव मदत केली पाहिजे. अशी मागणी विरोधकांनी केली आहे.

५२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

दरम्यान, अहिल्यानगर, बीड, जालना, सोलापूर, धाराशीव, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ हे जिल्हे सर्वाधिक बाधित असून, पुरामुळे राज्यातील ४१ हजार नागरिकांचे स्थलांतर करावे लागले आहे. खरीप हंगामातील सुमारे ५२ लाख हेक्टरवरील पीक पाण्यात गेले असून, खरीप हंगाम तर हातातून निसटला आहेच. परंतु रब्बी हंगामही धोक्यात आला आहे. अनेक ठिकाणी शेतजमीन खरवडून गेल्याने शेतकरी रब्बी हंगामापासून देखील वंचित राहणार आहे. मराठवाड्यात सोयाबीन, तूर, कापूस, ऊस, उडीद, बाजरी, कांदा, फळपिके आणि भाजी ही पिके मातीमोल झाली.

प. महाराष्ट्रात कापूस, ऊस, कांदा, बाजरी, सोयाबीन, मका, तूर, उडीद, फळपिके आणि भाजीपाला या पिकांना फटका बसला. उ. महाराष्ट्रात कांदा, कापूस, सोयाबिन, भुईमूग, बाजरी, फळपिके आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. कोकणात भात, नाचणी आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले.


About Author

Astha Sutar

Other Latest News