राज्यात ओला दुष्काळ जाहीर करणार का? दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले, म्हणाले…

राज्यातील गंभीर पुरस्थिती आणि शेतीच्या नुकसानीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर होणार की नाही, असा सवाल यानिमित्ताने उभा राहिला आहे.

मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला मुसळधार पावसाने झोडपून काढलं, ठिकठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. सरकारचे मंत्री आणि मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्री देखील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत. तर दुसरीकडे विरोधकांकडून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केली जात आहे. शिवाय, सरकारने जाहीर केलेली 2 हजार कोटींची मदत तुटपूंजी असल्याचे मत विरोधकांचे आहे. अशा परिस्थितीत राज्यात ओला दुष्काळ जाहीर होणार का, याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची भूमिका समोर आली आहे.

अजित पवारांची काय भूमिका?

उपमुख्यमंत्री मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. “शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आम्ही केंद्र सरकारकडे मदतीची मागणी करणार आहोत,” असे अजित पवार यांनी सांगितले आहे. तसेच ओल्या दुष्काळासंदर्भातही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. त्यामुळे सरकार याबाबत काही निर्णय घेणार का? असे विचारले असता, “आम्ही पण विरोधी पक्षात होतो. विरोधक अशा मागण्या करतात. पण सत्तेत असताना तुम्हाला अशा घटनांमुधून मार्ग काढावे लागतात. आज राज्य सरकारचे जे नियम आहेत, ते नियम बाजूला ठेवण्याची आमची तयारी आहे. शेतकऱ्यांची मदत करण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही काय-काय करता येईल यात आम्ही कुठेही कमी पडणार नाहीत,” असे सांगत अजित पवार यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची शक्यता फेटाळून लावली.

एकनाथ शिंदे म्हणाले….

“शेतकऱ्याच्या मागे उभं राहणं हे सरकारच काम आहे. सरकार यापूर्वी सुद्धा शेतकऱ्याच्या मागे उभ राहिलय,आजही उभं आहेत. जी काही तातडीची मदत आहे ती आधी केली जाईल. नंतर पाऊस पाणी कमी झाल्यावर पंचनामे करुन जी काही मदत आहे, ती दिली जाईल” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“तातडीची मदत तात्काळ देऊ. नंतर पंचनामे करुन जी मदत ठरवलीय ती देऊ. कारण नुकसान मोठं आहे. अटी शिथिल कराव्या लागतील. शेतकऱ्याच्या मागे उभं रहावं लागेल” असं एकनाथ शिंदे म्हणाले. “अशा काळात राजकारण करणं दुर्देव आहे. मदत होणं आवश्यक आहे. सिंगल कपड्यावर लोक बाहेर आहेत. त्यांना कपडे देणं, जीवनावश्यक वस्तू, धान्य, रेशन भांडी देण्याच काम आपलं कर्तव्य आहे. यात कोणी राजकारण आणू नये. सध्याच्या स्थितीत जेवढी मदत करता येईल, तेवढी केली पाहिजे. आसमानी संकट आहे. राजकारण बाजूला ठेऊन मदत केली पाहिजे” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

ओला दुष्काळ नाही?

थोडक्यात राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत सरकार सद्यस्थितीला तितके सकारात्मक नसल्याचे चित्र आहे. हे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवरून स्पष्ट होते. दुसरीकडे विरोधक मात्र ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी सातत्याने करताना दिसत आहेत. त्यामुळे सरकारी मदत नेमकी किती मिळणार आणि त्याचा शेतकऱ्यांना नेमका किती फायदा होणार, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित राहिला आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News