MP Breaking News
Sun, Dec 21, 2025

गणेशभक्तांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना मिळणार टोलमाफी

Written by:Rohit Shinde
Published:
 २७ ऑगस्ट रोजी लाडक्या गणरायाचे आगमन होणार ६ सप्टेंबरला विसर्जन होणार असून राज्य सरकारने घेतलेला टोलमाफीचा हा निर्णय कोकणात जाणाऱ्या लाखो भाविकांसाठी मोठा दिलासा देणार ठरणार आहे.
गणेशभक्तांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना मिळणार टोलमाफी

गणेशोत्सवाच्या काळात कोकणाला जाणाऱ्या गणेश भक्तांची संख्या प्रचंड वाढते. हा उत्सव म्हणजे घराघरात आणि गावोगावी एक वेगळाच जल्लोष असतो. मुंबई, पुणे तसेच इतर शहरांमधून हजारो कुटुंबे आपल्या गावी परततात. अशा परिस्थितीत गणेश भक्तांसमोर टोलचा प्रश्न मोठा असतो. कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या काळात गणेश भक्तांना या टोलमाफीचा फायदा मिळणार आहे.

गणेशोत्सवात नागरिकांना मोठा दिलासा

२३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोल नाक्यांवर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना व एसटी बसेसना टोलमाफी मिळणार आहे. गणेशोत्सवात दरवर्षी कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे यंदाही गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी “गणेशोत्सव 2025 – कोकण दर्शन” या नावाचे विशेष टोलमाफी पास देण्यात येणार असून त्यावर वाहन क्रमांक व वाहन मालकाची माहिती नोंदवली जाईल.

निर्णयाचा मोठा फायदा; शिंदेंचे गिफ्ट

शासनाच्या आदेशानुसार ग्रामीण व शहरी पोलीस तसेच प्रादेशिक परिवहन विभागाने पास वाटपाचे समन्वय साधून प्रवाशांना वेळेत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच या संदर्भात जाहीरात व सूचना प्रसिद्ध करून जनतेला माहिती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. हे पास संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस व वाहतूक विभागाकडे उपलब्ध असतील. परतीच्या प्रवासासाठी देखील हेच पास ग्राह्य धरले जाणार आहेत.

२७ ऑगस्ट रोजी लाडक्या गणरायाचे आगमन होणार ६ सप्टेंबरला विसर्जन होणार असून राज्य सरकारने घेतलेला टोलमाफीचा हा निर्णय कोकणात जाणाऱ्या लाखो भाविकांसाठी मोठा दिलासा देणार ठरणार आहे. खरंतर कोकणातील गणेश भक्तांच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होताना दिसत आहे.