धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येचा कट रचला; मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक गौप्यस्फोट

Rohit Shinde

मनोज जरांगे पाटील यांनी बीडचे नेते धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करत दावा केला आहे की, मुंडेंनी त्यांच्या हत्येचा कट रचला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार, हा कट रचण्यासाठी प्रथम खोटे रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात यश न मिळाल्याने, हत्येचा कट रचण्यात आला आणि नंतर औषध किंवा गोळ्या देऊन घातपात करण्याचा विचार झाला. मनोज जरांगेंनी केलेल्या दाव्यामुळे एकच खळबळ माजली आहे.

धनंजय मुंडेंनी हत्येचा कट रचला -जरांगे

तर राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करत “धनंजय मुंडे यांनी माझी सुपारी दिली होती” असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. “धनंजय मुंडेंकडून माझ्याविरोधात षडयंत्र करण्यात आले. माझ्या हत्येच्या कट रचण्यासाठी बीडमध्ये गुप्त बैठका करण्यात आल्या असा दावा देखील यावेळी जरांगे पाटील यांनी केला. तसेच धनंजय मुंडे यांनी आरोपींची सह्याद्री रेस्ट हाऊससमोर भाऊबीजेच्या दिवशी भेट घेतली. मला गाडी द्या आम्ही आम्ही गाडीने ठोकतो असं आरोपी म्हणाले. तर माझ्याकडे जुनी गाडी आहे बाहेरच्या पार्सिंगची ती घ्या असं मुंडे म्हणाले असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केला.

मराठा समाजाला शांततेचे आवाहन

पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आज मराठा समाजाला एक शब्द देतो की, मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत शांत राहा. मी मेल्यावर काय करयचा ते करा. सगळा महाराष्ट्र हसला पाहिजेत. आत्ता सुखाचे दिवस आले आहे . आत्ता सुखाचे दिवस आले आहे. असल्या वृत्तीचा नायनाट करावाच लागेल. सर्वांनी विषय ताकदीने लावून धरा तरच वृत्तीचा नायनाट होणार. करणाऱ्यापेक्षा करुन घेणारा अधिक जबाबदार असतो. एका मोठ्या नेत्याने कट रचला होता मात्र मी जिवंत आहे तोपर्यंत मराठ्यांनी टेन्शन घ्यायचं नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी सर्व मराठा समाजाला शांत राहण्याचं आवाहन केले.

नेमकं हत्येच्या कटाचं प्रकरण काय?

मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यासाठी बीड शहरात काही बैठका झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये जरांगे पाटलांच्या एका सहकाऱ्यासह अन्य एका व्यक्तीचा समावेश होता. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास केला आणि दोन आरोपींना ताब्यात घेतलं. दादा गरुड आणि अमोल खुणे अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, एका मोठ्या राजकीय नेत्याने जरांगे पाटील यांना संपवण्याचा हा कट रचल्याची कबुली ताब्यात घेतलेल्या आरोपींनी दिली आहे. त्यामुळे तपासाअंती धनंजय मुंडेंचे नाव समोर येते का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ताज्या बातम्या