आयटी क्षेत्रात सध्या कर्मचारी कपातीचे प्रमाण वाढले आहे आणि त्यामुळे कामगारांमध्ये मोठा टेन्शन निर्माण झाला आहे. जागतिक आर्थिक मंदी, कंपन्यांवरील खर्च नियंत्रण, तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या नवीन तंत्रज्ञानामुळे पारंपरिक नोकऱ्या धोक्यात येत आहेत. अनेक नामांकित कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. पुण्यात टीसीएस कंपनीत देखील असाच काहीसा संघर्ष उद्भवला आहे.
टीसीएसकडून जबरदस्तीने राजीनामे ?
टीसीएसमधून मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्यात येत असल्याच्या चर्चा आहेत. आयटी कर्मचाऱ्यांची संघटना नैसेंट इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी एम्प्लॉई सीनेट यांच्याकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेल पाठवण्यात आल आहे. त्यामध्ये कंपनीकडून जबरदस्ती करत राजीनामे घेतले जात असल्याची तक्रार करण्यात येत आहे. टीसीएसच्या पुण्याच्या कार्यालयातील 2500 कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. तर, कंपनीनं देखील या संदर्भात त्यांची भूमिका मांडली आहे.
टीसीएसच्या पुण्याच्या ऑफिसमधून अलीकडे 2500 कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्यास भाग पाडलं गेलं किंवा अचानक नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं. कर्मचारी संघटनेनं हे गंभीर संकट असून तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. NITES चे अध्यक्ष हरप्रीत सिंह सलूजा यांनी म्हटलं की, टीसीएसनं इंडस्ट्रीयल डिस्प्यूटस एक्ट,1947 चं उल्लंघन केलं आहे. ना सरकारला नोटीस दिलं गेल, ना कर्मचाऱ्यांना योग्य प्रक्रियेप्रमाणं हटवलं गेलं. कंपनीनं कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडल्याचं सलूजा यांनी म्हटलं.

टीसीएसमध्ये नेमकं काय घडतंय?
टीसीएस गेल्या काही महिन्यांमध्ये कर्मचारी कपात आणि ऑफर लेटर होल्ड केल्यानं वादात आहे. कंपनीनं जुलै 2025 मध्ये 12260 कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा केली होती. ही कर्मचारी कपात एकूण कर्मचाऱ्यांच्या कपातीच्या 2 टक्के आहे. आर्थिक वर्ष 2025-26 एप्रिल- जून तिमाहीत टीसीएसकडे 613069 कर्मचारी होते. टीसीएसमधील कर्मचारी कपातीचा मुद्दा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोहोचला आहे. आता सरकार या वादात काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे.
टीसीएसनी सर्व आरोप फेटाळले!
टीसीएसनं सर्व आरोप फेटाळले आहेत. कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या वक्तव्यात म्हटलं की जी माहिती दिली जातेय ती चुकीची आणि भ्रामक आहे. आमच्या अलीकडील अभियानात केवळ मर्यादित संख्येत कर्मचाऱ्यांवर परिणाम झाला आहे. ज्यांच्यावर परिणाम झालाय, त्यांची पूर्ण देखभाल आणि सेवरेंस पॅकेज दिलं गेलं आहे, जे त्यांच्या अधिकारानुसार होतं.











