ई-वॉटर टॅक्सी सेवा ही जलवाहतुकीतील एक नवी सुविधा आहे. या सेवेमुळे प्रवाशांना शहरांमध्ये आणि पर्यटन स्थळांवर जलद व सुरक्षित प्रवासाची सोय मिळते. पर्यावरणपूरक तंत्रज्ञानावर आधारित ही सेवा प्रदूषण कमी करण्यास मदत करते. त्यामुळे प्रवास सुलभ, वेळ वाचवणारा आणि सोयीस्कर ठरतो. मुंबईच्या समुद्रात देखील लवकरच अशी ई-वॉटर टॅक्सी सेवा सुरू होणार आहे. यामुळे ही सेवा अनेक बदल घडवून आणेल, अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत.
मुंबईकरांच्या सेवेत ई-वॉटर टॅक्सी
मुंबईत ई-वॉटर टॅक्सी सेवा 22 सप्टेंबरपासून सुरु होणार असल्याची माहिती मिळत आहे. गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीएपर्यंत ही टॅक्सी चालणार आहे. या बोटींची प्रवासी क्षमता 20 प्रवासी अशी असून गेटवे ते जेएनपीए प्रवासासाठी 100 रुपये असे तिकिट दर असण्याची माहिती मिळत आहे. या टॅक्सीमुळे गेट वे ऑफ इंडिया ते JNPA प्रवास फक्त 40 मिनिटांत होणार आहे. दोन ई-वॉटर टॅक्सी प्रवासासाठी सज्ज असणार असून यामध्ये एक ट्रक्सी सौर ऊर्जेवर तर दुसरी पूर्णत विद्युत टॅक्सी असणार आहे. या टॅक्सीच्या देखभालीची जबाबदारी भारत फ्रेट ग्रुपकडे सोपवली असल्याची माहिती मिळत आहे.
ई-वॉटर टॅक्सी सेवेचे फायदे कोणते?
ई-वॉटर टॅक्सी सेवेचे अनेक फायदे आहेत. ही सेवा प्रवाशांना वाहतूक कोंडीपासून दिलासा देत जलद आणि आरामदायी प्रवासाची सुविधा देते. पाण्यावरून प्रवास केल्याने वेळ वाचतो तसेच प्रदूषणातही घट होते. ही सेवा पर्यावरणपूरक असून इंधनाची बचत करते. पर्यटन क्षेत्राला चालना मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळते. प्रवाशांना सुरक्षित, स्वस्त आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रवासाचा अनुभव मिळतो. विशेषतः शहरांमधील जोडणी सोपी करून वाहतुकीच्या ताणाला पर्याय उपलब्ध करून देते. त्यामुळे ई-वॉटर टॅक्सी सेवा भविष्यातील टिकाऊ आणि उपयुक्त प्रवासाचा उत्तम पर्याय ठरते.





