MP Breaking News
Fri, Dec 19, 2025

“पर्यावरण खात्याला निधी मिळेना…”; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंकडून खंत व्यक्त

Written by:Rohit Shinde
Published:
पर्यावरण खात्यात निधीची कमतरता असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी त्याबाबत खंत बोलून दाखवली आहे.
“पर्यावरण खात्याला निधी मिळेना…”; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंकडून खंत व्यक्त

राज्यात एकीकडे लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी सातत्याने वापरला जात असताना आता पर्यावरण खात्यात निधीची कमतरता असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी त्याबाबत खंत बोलून दाखवली आहे. त्यामुळे पर्यावरण खात्याशी संबंधित अनेक कामे सध्या रखडलेली आहेत.

पर्यावरण खात्याकडे बजेट नाही -पंकजा मुंडे 

नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमात सहभागी झालेल्या पंकजा मुंडेंनी आपल्या खात्याच्या अडचणी स्पष्टपणे मांडल्या. पर्यावरण खात्यासंदर्भात बोलताना त्या म्हणाल्या, “सध्या मी पर्यावरणमंत्री आहे. प्रदूषण करणारे अनेक उद्योग उभे राहिले आहेत. आपण सगळ्यांनी मिळून कचऱ्याची सामूहिक जबाबदारी घेतली पाहिजे. आज लोकांमध्ये पर्यावरणाच्या बाबतीत जागरूकता वाढली आहे. वातावरणीय बदल हे गंभीर विषय आहेत आणि हे खातं सुद्धा माझ्याकडे आहे. पण माझ्या खात्याकडे बजेट नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे शासनाने आम्हाला थोडी तरी मदत करावी.” अशी आर्जव यावेळी मंत्री पंकजा मुंडेंनी यावेळी केली.

निधीच्या कमतरतेमुळे अनेक मंत्री नाराज

पुढे बोलताना मुंडे म्हणाल्या की, “राज्यात अनेक साखर कारखाने आहेत, टायर जाळून ऑइल बनवणाऱ्या कंपन्या आहेत, खाणी आहेत, वाळू उपसा होत आहे  या सगळ्या बाबतीत आम्हाला अधिक सक्रिय राहावं लागणार आहे. पण जेव्हा खात्याकडेच निधी नसतो, तेव्हा कामांची अंमलबजावणी करणं कठीण जातं.” महायुती सरकारमधील हे पहिलेच असे वक्तव्य नाही. यापूर्वीही अनेक मंत्र्यांनी निधीवाटपावरून किंवा अधिकारांच्या मर्यादांवरून अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली आहे. पंकजा मुंडे यांचे हे वक्तव्य म्हणजे सरकारमधील अंतर्गत विसंवादाचा आणखी एक स्पष्ट संकेत मानला जात आहे. त्यामुळे महायुतीमधील अनेक खाती आणि मंत्री निधीच्या कमतरतेचा सामना सध्या करत आहेत, हे यावरून स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे महायुतीमधील अनेक मंत्री नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. मंत्री पंकजा मुंडेंनी खंत व्यक्त केल्याने आता अजून काही खात्याचे मंत्री समोर बोलतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पर्यावरण खाते महत्वाचे खाते असून या खात्याकडे पुरेसा निधी नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.