EV Truck: देशातील पहिला स्वदेशी इलेक्ट्रिक ट्रक लाँच; ट्रकमध्ये खास फिचर्स, जाणून घ्या…

ब्ल्यू एनर्जी मोटर्सने इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात नवी क्रांती केली आहे. देशातील पहिल्या स्वदेशी इलेक्ट्रिक ट्रकची निर्मिती करण्यात आली, त्या ट्रकचे लाँचिंग नुकतेच पार पडले.

भारतात गेल्या काही वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. पर्यावरणपूरक, इंधन-बचत आणि कमी देखभाल खर्चामुळे लोकांचा कल पारंपरिक पेट्रोल-डिझेल वाहनांऐवजी इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढला आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी दिलेल्या योजना, सबसिडी, तसेच चार्जिंग स्टेशनच्या वाढत्या सुविधा यामुळे या क्षेत्रात मोठी गती आली आहे.

शहरांपासून ग्रामीण भागांपर्यंत इलेक्ट्रिक स्कूटर, कार, बस लोकप्रिय होत आहेत. विशेषतः तरुण पिढी आणि कॉर्पोरेट कंपन्या पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार करत आहेत. इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्देशाने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर भविष्यात आणखी वाढेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आता ब्लु एनर्जीने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे.

स्वदेशी बनावटीचा इलेक्ट्रिक ट्रक लाँच, काय विशेष?

ब्ल्यू एनर्जी मोटर्स निर्मित स्वॅपेबल बॅटरी असलेल्या देशातील पहिल्या स्वदेशी इलेक्ट्रिक ट्रकचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आले. ब्ल्यू एनर्जी मोटर्स निर्मित स्वॅपेबल बॅटरी असलेला इलेक्ट्रिक ट्रक म्हणजे ‘रिव्होल्यूशन ऑन व्हील’ असून त्यातील तंत्रज्ञान आणि कार्यक्षमता लक्षात घेता येत्या काळात या क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विस्तार होईल. राज्य शासन मुंबई- पुणे इलेक्ट्रीक कॉरिडोअरसारखे अन्य कॉरिडोर करण्यासाठी सर्व सहकार्य करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

माल वाहतूक करणाऱ्या ट्रकद्वारे मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होत असल्याने सार्वजनिक वाहतुकीच्या क्षेत्रात इलेक्ट्रिक ट्रकची आवश्यकता होती. कार्गो वाहतूक करणाऱ्या क्षेत्रात ब्ल्यू एनर्जीने अत्यंत उत्तम आणि ‘मेड इन इंडिया’ ट्रकची निर्मिती केली आहे. ही बाब देशाचे ‘मेक इन इंडिया’चे स्वप्न साकार करण्यासारखी आहे.

इलेक्ट्रिक ट्रकच्या निर्मितीला प्रोत्साहन देणार -मुख्यमंत्री

महाराष्ट्र शासनाने ईव्ही क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे धोरण तसेच पर्यायी इंधन धोरण अशी शाश्वत धोरणे स्वीकारली असून या क्षेत्रातील उद्योगाला त्याचा फायदा व्हावा आणि पर्यावरणाचे या माध्यमातून रक्षण व्हावे हे आहे. महाराष्ट्र शासन मुंबई-पुणे इलेक्ट्रिक कॉरिडोअरसाठी तसेच अन्यत्रही बॅटरी स्वॅपींग आणि चार्जिंगच्या कॉरिडॉरसाठी ब्ल्यू एनर्जीसोबत काम करेल. या ट्रकच्या किंमती डिझेल वाहनांशी स्पर्धा करणाऱ्या असल्याने या वाहनांना चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

ब्ल्यू एनर्जीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध भुवलकर यांनी कंपनीविषयी माहिती दिली. मालवाहतूकीला पर्यावरणपूरक पर्याय देण्यासाठी देशातील पहिला एलएनजी ट्रक सप्टेंबर 2022 मध्ये बनविण्यात आली. इलेक्ट्रिक वाहन हे भविष्य असल्याने आणि शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दीष्ट गाठण्यासाठी ईव्ही ट्रकचा शुभारंभ करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.


About Author

Rohit Shinde

Other Latest News