सायबर हल्ले आणि हॅकींगचे वाढते प्रमाण हे आजच्या डिजिटल युगातील गंभीर आव्हान ठरत आहे. इंटरनेट, सोशल मीडिया, ऑनलाइन बँकिंग आणि ई-व्यवहार यांचा वापर वाढल्याने गुन्हेगारांसाठी संधीसुद्धा वाढल्या आहेत. वैयक्तिक माहिती, आर्थिक व्यवहार, सरकारी कागदपत्रे आणि महत्त्वाचे डेटा हे सतत धोक्यात असतात. विशेषतः फिशिंग, मालवेअर, रॅन्समवेअर आणि सोशल इंजिनीअरिंगसारख्या पद्धतींमुळे अनेक नागरिक व संस्था फसवले जातात. अशा या हल्ल्यांपासून मोठे मंत्री अथवा नेत्यांना देखील धोका आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एक्स अकाऊंट काही काळासाठी हॅक झाले होते.
शिंदेंचे X अकाऊंट काही काळासाठी हॅक
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक्स अकाउंट रविवारी सकाळी काही काळासाठी हॅक झाल्याची घटना घडली. हॅकर्सनी त्यांच्या हँडलवरून पाकिस्तान व तुर्कीचे झेंडे दर्शविणारी पोस्ट टाकली. यामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र तांत्रिक पथकाने त्वरीत हस्तक्षेप करून हँडल पुन्हा सुरळीत केले आणि सर्व संशयास्पद पोस्ट हटविण्यात आल्या. शिंदे यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले की, हॅकिंगची माहिती मिळताच तांत्रिक तज्ज्ञांना कामाला लावण्यात आले. अल्पावधीतच अकाउंट पुन्हा कार्यान्वित झाले असून आता ते पूर्ववत चालू आहे. या प्रकारामुळे राजकारण्यांच्या सोशल मीडिया सुरक्षेबाबत नवे प्रश्न निर्माण झाले आहेत.

भारतामध्ये गेल्या काही वर्षांत सायबर गुन्ह्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. बँकिंग, दूरसंचार, आरोग्यसेवा आणि ऊर्जा क्षेत्रे ही या हल्ल्यांची मुख्य लक्ष्ये ठरत आहेत. त्यामुळे सायबर हल्ल्यांपासून बचाव करणे आवश्यक आहे.
सायबर हल्ल्यांपासून काळजी घ्या!
सायबर हल्ल्यांची प्रमुख कारणे म्हणजे डिजिटल व्यवहारांचे वाढलेले प्रमाण, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा गैरवापर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील तणाव. यामुळे नागरिकांनी जागरूक राहणे अत्यावश्यक आहे. संशयास्पद लिंकवर क्लिक न करणे, मजबूत पासवर्ड वापरणे आणि फसवणूक झाल्यास तातडीने 1930 या क्रमांकावर संपर्क करणे किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवणे हा सुरक्षिततेचा मूलमंत्र मानला जात आहे.
सायबर हल्ल्यांपासून काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण आजच्या काळात ऑनलाइन व्यवहार, सोशल मीडिया आणि बँकिंग सेवांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. योग्य दक्षता न घेतल्यास आपली वैयक्तिक माहिती, आर्थिक व्यवहार आणि महत्वाचा डेटा धोक्यात येऊ शकतो.