सावधान! दिवाळीत बनावट पनीरचा सुळसुळाट; योग्य निवडा किंवा घरी बनवा, कसं ते जाणून घ्या….

Rohit Shinde

नुकतच दिल्लीमध्ये एका ठिकाणी ५५० किलोग्रॅमपेक्षा जास्त बनावट पनीर जप्त केल्याच्या बातमीने लोकांना त्यांच्या वापराबद्दल पुनर्विचार करण्यास भाग पाडले आहे. या घटनेने पुन्हा एकदा बाजारात भेसळीचा धोका आहे, मग ती सणासुदीच्या काळात असो किंवा सामान्य दिवसांमध्येही असो. बनावट पनीर दुधाऐवजी पाम तेल, डिटर्जंट्स, युरिया आणि कृत्रिम रसायने यासारख्या स्वस्त, अखाद्य आणि हानिकारक घटकांपासून बनवले जाते. त्यामुळे ऐन सणासुदीत बनावट पनीर कसे ओळखायचे किंवा घरीच पनीर कसे बनवायचे, त्याबाबतीत अधिक सविस्तर जाणून घेऊ…

बनावट पनीर कसे ओळखायचे?

बाजारातील बनावट पनीर ओळखण्यासाठी काही सोप्या आणि प्रभावी पद्धती वापरता येतात. खरे पनीर साधारणतः पांढऱ्या रंगाचे, थोडे मऊ आणि गंधहीन असते, तर बनावट पनीर किंचित पिवळसर किंवा चकाकीदार दिसते आणि त्याला साबणासारखा वास येतो. खरे पनीर दाबल्यावर थोडे लवचिक वाटते, तर बनावट पनीर कठीण किंवा तुकडे पडणारे असते. गरम पाण्यात थोडेसे पनीर टाकल्यास खरे पनीर आकार टिकवून ठेवते, तर बनावट पनीर पाण्यात वितळते किंवा चिकट होते. तसेच, जास्त फेस येणे किंवा तेलकट थर दिसल्यास ते कृत्रिम पदार्थांच्या वापराचे लक्षण आहे.

नेहमी विश्वसनीय दुकानदारांकडूनच पनीर खरेदी करावे आणि शक्य असल्यास घरच्या घरी दूध उकळून लिंबाचा रस वापरून ताजे पनीर तयार करावे. त्यामुळे आरोग्य सुरक्षित राहते आणि बनावट अन्नपदार्थांपासून संरक्षण मिळते.

घरी पनीर कसे बनवायचे?

घरी पनीर बनवणे अतिशय सोपे आणि आरोग्यदायी आहे. सर्वप्रथम एक लिटर ताजे दूध उकळा. दूध उकळल्यावर त्यात थोडा लिंबाचा रस किंवा व्हिनेगर घाला आणि हळूवारपणे ढवळा. काही मिनिटांत दूध फाटून त्यात दही आणि पाणी वेगळे होईल. त्यानंतर हे मिश्रण स्वच्छ सूती कपड्यात ओतून गाळा आणि थंड पाण्याने धुवा, जेणेकरून लिंबाचा आंबटपणा नाहीसा होईल. नंतर कपड्यात घट्ट बांधून त्यावर वजन ठेवा आणि १ ते २ तास ठेवून द्या. इतकेच तुमचे घरचे ताजे, मऊ आणि स्वादिष्ट पनीर तयार आहे!

ताज्या बातम्या