हिवाळ्यात किनारी भागात माशांची उपलब्धता कमी होणे ही एक नैसर्गिक आणि वारंवार दिसणारी प्रक्रिया आहे. तापमानातील घट, समुद्रातील पाण्याच्या प्रवाहात होणारे बदल आणि खाद्यसाखळीतील चढ-उतार यामुळे अनेक मासे खोल समुद्राकडे स्थलांतर करतात. त्यामुळे किनाऱ्याजवळील मच्छी साठा कमी होतो. तसेच, काही प्रजाती प्रजननासाठी विशिष्ट ठिकाणी जातात, ज्याचा परिणाम मासेमारीवर होतो. यामुळे स्थानिक मच्छीमारांचे उत्पन्न कमी होते आणि बाजारात मासळीचे दर वाढतात. अशीच काहीशी परिस्थिती सध्या नवी मुंबईतील मासळी बाजारांमध्ये निर्माण झालेली आहे.
गारठा वाढल्याने माशांचे दर कडाडले
गेल्या आठवड्यापासून वातावरणातील गारठा वाढल्याने ताज्या मासळीची आवक घटली आहे. परिणामी मासळीचे भाव देखील वाढले आहेत. नवी मुंबईतील खाडी किनारी मिळणारी मासळी ही वातावरणातील गारठयामुळे आता कमी प्रमाणात मिळू लागली आहे. वातावरणातील बदलाचा फटका हा समुद्रातील मासळीच्या विविध प्रजातींना बसतो. त्यात गारठा वाढला की समुद्रातील तापमानही कमी होते, त्यामुळे खोल समुद्रातील मासळीही गारठल्याने ती तळाला गेली आहे. परिणामी मासळीची आवक ४० टक्क्यांपेक्षा अधिक घटली असल्याने मासळीच्या दरातही वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे खवय्यांबरोबर मच्छीमारही आर्थिक संकटात सापडले आहेत.

नवी मुंबईतील बहुतांश मछिमार हे मुंबई येथील भाऊचा धक्का व कुलाबा येशून ताजी मासळी खरेदी करतात. मात्र त्या मासळीची देखील आवक कमी झाल्याने त्यांना देखील भाव वाढीचा फटका बसला आहे. एकीकडे गारठा वाढला तर दुसरीकडे वाढते प्रदूषण याचा सगळा फटका मासळीच्या आवक वर होतो, त्यामुळे कमी मासळी मिळत असल्याने त्यांचे दरही वाढीव झाले आहेत. दिवाळे खाडी पासून ते ऐरोली खाडी पर्यंत स्थानिक मच्छिमार मासेमारी करतात. या खाडीतून मासे, निवटी, बोईस, कोलंबी तसेच चिवणी मिळतात, पण गारठा वाढल्याने त्यांची देखील आवक खूपच कमी झाली आहे. त्यामुळे मच्छिमार बांधवांची दिवसभराची मेहनत वाया जात असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बाजारात माशांचा दराचा कल काय ?
मासळीचे सध्याचे दर (प्रति किलो)
| मासळीचे नाव | दर (प्रति किलो) |
| खापरी पापलेट | ₹ १५०० |
| घौळ | ₹ १३०० |
| जिताडा | ₹ १२०० |
| सुरमई | ₹ ११०० |
| पापलेट | ₹ १००० |
| हलवा | ₹ ९५० |
| कोळंबी | ₹ ७०० |
हिवाळ्यात आणि उपलब्धता कमी झाल्यानंतर माशांचे दर वाढल्याने खवय्यांची निराशा वाढते. समुद्रात मासे खोल पाण्याकडे स्थलांतर करणे, खराब हवामानामुळे मासेमारी कमी होणे आणि वाढलेले इंधनदर यामुळे बाजारातील मासळीचे भाव अचानक वाढतात. साधारणपणे लोकप्रिय मासे जसे की सुरमई, पोम्फ्रेट, बांगडा, रावस यांच्या किंमतीत मोठी उसळी दिसून येते. रोजच्या आहारात मासळीला प्राधान्य देणाऱ्या कुटुंबांच्या बजेटवर याचा मोठा परिणाम होतो. स्थानिक बाजारात उपलब्धता कमी आणि मागणी जास्त असल्याने मासळीप्रेमी निराश होतात. मासेमारी स्थिर ठेवण्यासाठी नियोजनबद्ध धोरणे आणि किनारी व्यवस्थापन अत्यंत गरजेचे आहे.











