पुणे विमानतळाचे महत्त्व अतिशय मोठे आहे. कारण ते पुणे शहरासह संपूर्ण आसपासच्या औद्योगिक, आयटी आणि शैक्षणिक क्षेत्रांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय जोडणी प्रदान करते. रोज हजारो प्रवासी व्यवसाय, शिक्षण, वैद्यकीय कारणे आणि पर्यटनासाठी या विमानतळाचा उपयोग करतात. त्यामुळे उड्डाणे सुरळीत चालणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र अशा परिस्थितीत गेल्या दोन दिवसांपासून पुणे विमानतळावरील विमानसेवा विस्कळीत झाल्याची माहिती समोर येत आहे. लोहगाव येथील पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सलग दुसऱ्या दिवशीही मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. बाहेरून येणाऱ्या आणि पुण्यातून उड्डाण करणाऱ्या 30 हून अधिक विमानांचं वेळापत्रक विस्कळीत झाल्याची माहिती समोर येत आहे.
विमानांच्या उड्डाणांचे वेळापत्रक विस्कळीत
तुम्हीही जर इतक्यात विमान प्रवास करणार असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. लोहगाव येथील पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सलग दुसऱ्या दिवशीही मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. बाहेरून येणाऱ्या आणि पुण्यातून उड्डाण करणाऱ्या 30 हून अधिक विमानांचं वेळापत्रक मोठ्या प्रमाणावर बिघडल्याचं दिसून आलं. या विमानांना कमीत कमी २० मिनिटांपासून ते तब्बल दोन तासांपर्यंत विलंब झाला. गेल्या दोन दिवसांपासून पुणे विमानतळावर येणाऱ्या विमानांना उशीर होत असल्यामुळे येथील उड्डाणांचं वेळापत्रक विस्कळीत झालं आहे. लोहगाव विमानतळावरून दररोज 200 हून अधिक विमानांची ये-जा असते, ज्यामधून सुमारे 32 ते 33 हजार प्रवासी प्रवास करतात. मात्र, वेळापत्रक बिघडल्यामुळे अनेक प्रवाशांना विमानतळावर ताटकळत बसावं लागलं.
विमानसेवा विस्कळीत; प्रवाशांना मोठा त्रास
गुरुवारी रात्रीपासूनच विमानांच्या वेळापत्रकात अनियमितता दिसून आली. मध्यरात्री १२ ते सकाळी ६ या वेळेत बंगळूरु, चेन्नई, नागपूर, दिल्ली, कोलकाता यांसारख्या प्रमुख शहरांतून पुण्यात दाखल होणाऱ्या विमानांना प्रामुख्याने उशीर झाला. दरम्यान, प्रशासनाने या विलंबाचं कारण स्पष्ट करताना सांगितलं की, उत्तर भारतात थंडीच्या लाटांमुळे निर्माण होणारे दाट धुके हे एक महत्त्वाचे कारण असू शकते, ज्याचा परिणाम थेट विमानांच्या उड्डाण आणि लँडिंगवर झाला आहे. अशा हवामानामुळे विमानांना त्यांच्या मूळ ठिकाणावरूनच उशीर होत असल्याने, पुणे विमानतळाचे वेळापत्रकही बिघडले आहे. २-३ दिवसांपूर्वीच पुणे विमानतळावरून आणखी एक घटना समोर आली होती.यात दोन वेगवेगळ्या विमानांच्या वैमानिकांनी उड्डाण करण्यास नकार दिल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. या प्रकारामुळे पुणे-दिल्ली आणि पुणे-अमृतसर या दोन विमानांच्या वेळापत्रकात तीन तासांहून अधिक विलंब झाला.












