MP Breaking News
Thu, Dec 18, 2025

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना Good News! मुंबई-गोवा हायवेबाबत मोठा निर्णय

Written by:Smita Gangurde
Published:
गणेशोत्सवादरम्यान मोठ्या संख्येने मुंबईकर कोकणात जात असतात. मात्र जड वाहनांमुळे रस्त्यांवर मोठी गर्दी होते.
गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना Good News! मुंबई-गोवा हायवेबाबत मोठा निर्णय

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंबईकरांची कोकणात जाण्याची तयारी सुरू झाली आहे. रेल्वेचं तिकीट मिळविण्यापासून बसच्या बुकिंगपासून विविध पातळीवर मुंबईकरांचा कोकणात जाण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. दरम्यान गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक चांगली बातमी आहे.

गणेशोत्सवाच्या पूर्व तयारीचा प्रवास म्हणून जड वाहनांना बंदी

गणेशोत्सवासाठी मूर्तीचं आगमन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवास आदींसाठी सार्वजनिक हितास्तव मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर वजनक्षमता 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त वाहनांना मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 155 मधील तरतूदीनुसार वाहतूक बंदी करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पूर्व तयारीचा प्रवास म्हणून 23 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12 वाजेपासून ते 28 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजेपर्यंत या कालावधीत जड वाहनांना वाहतूक बंदी असणार आहे. यामध्ये अवजड वाहने, ट्रक, मल्टीएक्सल, ट्रेलर, लॉरी आदी वाहनांचा समावेश आहे.

गणेशोत्सवादरम्यान मोठ्या संख्येने मुंबईकर कोकणात जात असतात. मात्र जड वाहनांमुळे रस्त्यांवर मोठी गर्दी होते. परिणामी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. गणेशोत्सवाच्या काळात जड वाहनांना मुंबई गोवा महामार्गावर बंदी केल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गणेशोत्सवातही नो टेन्शन..

तसेच 5 आणि 7 दिवसांच्या गणपतीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन आणि परतीच्या प्रवासासाठी 31 ऑगस्ट आणि 2 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपासून रात्री 11 वाजेपर्यंत, अनंत चतुर्दशी 11 दिवसांचे गणपती विसर्जन, परतीच्या प्रवासाकरिता 6 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपासून ते 7 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 8 वाजेपर्यंत या कालावधीत जड वाहतूकीस बंदी राहील.

महामार्गावर बंदी असलेल्या कालावधी व्यतिरिक्त उर्वरित कालावधीत ज्यांची वजन क्षमता 16 टन किंवा 16 टनांपेक्षा जास्त आहे, अशा वाहनांना 28 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजेपासून ते 31 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत, 31 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजेपासून ते 2 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत आणि सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजेपासून ते 6 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत वाहतूकीस परवानगी राहील. तसेच सर्व वाहनांना 7 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेनंतर नियमित वाहतुकीस परवानगी असेल.

हे निर्बंध जेएनपीटी बंदर ते जयगड बंदर येथून आयात-निर्यात मालाची वाहतूक करणारी वाहने, दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, औषधे, लिक्वीड मेडीकल ऑक्सिजन, अन्न धान्य, भाजीपाला व नाशवंत माल आदी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना लागू राहणार नाही. तसेच मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 च्या रस्ता रूंदीकरण, रस्ता दुरूस्ती कामकाज आणि साहित्य, माल ने–आण करणाऱ्या वाहनांनाही ही बंदी लागू राहणार नाही. यासंदर्भात वाहतुकदारांना संबंधित वाहतूक विभाग, महामार्ग पोलीस यांनी प्रवेशपत्र देण्याची कार्यवाही करावी.