मुंबई- गणेशोत्सव जवळ येतोय तसतसा गणेशासाठी यावेळी काय मखरं करायचं, काय डेकोरेशन करायचं, याचा विचार सगळ्यांच्याच डोक्यात सुरु झालेला असेल. गेल्या सकाही वर्षांत या डेकोरेशनसाठी प्लास्टिकच्या फुलांचा वापर करण्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. मात्र हीच वेगवेगळ्या रंगाची सदा टवटवीत दिसणारी फुलं तब्येतीसाठी हानीकारक आहेत का, असा मुद्दा आता पुढे येताना दिसतोय.
या प्लास्टिकच्या फुलांशिवाय सजावट, आरास पूर्णच होत नाही, या कृत्रिम फुलांनी त्यांचं मार्केटचं डाऊन करून टाकलंय. शिवाय ही कृत्रिम फुलं तुमचं आरोग्य धोक्यात आणू शकतात. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी कृत्रिम फुलांमुळं होणाऱ्या नुकसानीचा पाढाच विधानसभेत मांडला.
प्लास्टिकची फुलं आरोग्याला घातक?
भारताचा शत्रू असणाऱ्या चीनमध्ये बहुतांशी प्लास्टिक फुलांची निर्मिती होते. फुलं बनवण्यासाठी मेटॅलिक ऑक्साईड, टेटेनियम डायऑक्साईड अशा घातक वायूंचा वापर होतो. या वायूंचा विषारी गंध कृत्रिम फुलांतून नाकावाटे फुफ्फुसांमध्ये जातो. त्यामुळं कॅन्सरसारखा दुर्धर आजार होऊ शकतो कृत्रिम फुलांना दिलेला पिवळा ‘झॅन्थिन’ रंगही कॅन्सरला निमंत्रण देतो. शिवाय पुरुषांचे टेस्टिस आणि महिलांच्या ओव्हरीजमध्ये हे वायू पसरुन वंध्यत्व येतं
प्लास्टिक फुलं, फुलांच्या माळा भारतात पाठवून देशाचा जननदर घटवण्याचा कुटील डाव चीननं आखलाय.
फुलशेतीवर कृत्रिम फुलांमुळे गंडांतर
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील म्हसवे हे फुलशेतीत अग्रेसर असलेलं गाव. राज्यात फुलांचे गाव अशी या गावाची ओळख. मात्र प्लास्टिक फुलांमुळे शेतकर्यांच्या फुलशेतीवरही गंडांतर आलंय. प्लास्टिक फुलांच्या अतिक्रमणामुळं गावातील वेअर हाऊस बंद पडलेत.
राज्यात 3 लाख शेतकरी फुलशेती करतात. शेतकरी आणि मजूर मिळून 20 लाखांपेक्षा अधिक लोकांचं पोट फुलशेतीवर अवलंबून आहे. मात्र प्लास्टिक फुलांमुळं 20 लाख लोकांचा रोजगार धोक्यात आलाय. 7-8 वर्षांपूर्वी फुलशेतीची उलाढाल तब्बल 2,000 कोटी रुपये इतकी होती. मात्र आता कृत्रिम फुलांची उलाढाल 1 हजार 200 कोटी रुपये इतकी वाढलीय. नैसर्गिक फुलशेतीवर कृत्रिम फुल विक्रीमुळं गंडांतर आल्याचं कृषी विभागाच्या अहवालात म्हटलंय
प्लास्टिक फुलांवर बंदीचे संकेत
त्यामुळं प्लास्टिकच्या फुलांवर बंदी घालण्याची मागणी आमदार महेश शिंदेंनी केलीय. तर याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. प्लास्टिकच्या फुलांवर बंदी येईल तेव्हा येईल… मात्र नागरिकांनीही कृत्रिम फुलांचा वापर टाळायला हवा.





