TET पेपरफुटीला जबाबदार 7 जणांची टोळी गजाआड; कोल्हापूर पोलिसांची धडक कारवाई, तपास सुरू

Rohit Shinde

राज्य सरकारच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात ‘टीईटी’चा पेपर फोडण्यासाठी काही जणांनी प्रयत्न केला होता. यानंतर कोल्हापूर पोलिसांनी शिथापीने तपास करत मोठी कारवाई केली आहे. एका मोठ्या टोळीला पोलिसांनी पकडले. या टोळीतील सात जणांना अटक केली असून दहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये काही शिक्षकही असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, संबंधितांची कसुन चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

प्रकरण नेमकं काय ?

शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा राज्य सरकारने सक्तीची केली आहे. त्यानुसार रविवारी ही परीक्षा झाली; पण या परीक्षेतील पेपर आधीच देतो असे सांगून जिल्ह्यात एक टोळी कार्यरत झाली होती. या टोळीमध्ये दत्तात्रय चौगुले आणि गुरुनाथ चौगुले या राधानगरीतील दोघांचा समावेश होता. त्यांच्यासह अनेक जण या टोळीत सहभागी होऊन शिक्षकांच्याकडून मोठ्या प्रमाणात रक्कम उकळली. काहींनी तर कोरे धनादेश दिले.

रविवारी सकाळी पेपर होता शनिवारी रात्रीच या सगळ्यांना पेपर देण्यासंदर्भात शब्द देण्यात आला. त्यानुसार कागल तालुक्यातील सोनगे येथे अनेकांना बोलवण्यात आले. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचला आणि सोनगे येथील एका फर्निचर मॉलवर छापा टाकला. तेथे महेश भगवान गायकवाड हा पेपर आणून देणार होता. अनेक एजंट यामध्ये कार्यरत होते. याची व्याप्ती मोठी असल्यामुळे प्रथम सर्वांना ताब्यात घेण्यात आले.

अधिकचा तपास सुरू

पेपर फोडण्याची सर्व प्रक्रिया त्यांनी केली होती; पण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी या टोळीचा इरादा उद्धवस्त केला. मुरगुड पोलिस व कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांनी याप्रकरणी सात जणांना अटक केली आहे. याशिवाय दहा संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून कागदपत्रे, कोरे धनादेश याशिवाय इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात आणखी काहींचा समावेश असल्याची शक्यता आहे. यामुळे पोलिस या अनुषंगाने तपास करीत आहेत. त्यामुळे या प्रकरणाशी संबधित आणखी काही मुद्द्यांचा लवकरच उलगडा होणार आहे.

ताज्या बातम्या