मुंबई- शनिवारी अनंत चतुर्दशीला मुंबई, पुण्यासह राज्यभरात वाजत गाजत णपती बाप्पावा निरोप देण्यात येणार आहे. राज्यभरात यासाठीची जय्यत तयारी करण्यात आलीय. विसर्जनाच्या ठिकाणी आणि वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय. समुद्र, नदी किनाऱ्यांवर येणाऱ्या लाखो नागरिकांच्या सुरक्षेकडेही लक्ष ठेवण्यात येतंय.
कुठे कशी आहे तयारी?
मुंबईत गिरगाव, दादर आणि जुहू चौपाटी परिसरात निसर्जनासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीनेही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. गिरगाव परिसरातील वाहतूक मध्यरात्रीपासूनच वळवण्यात आलीय. तसंच पार्किंगसाठी वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलीय. दादर आणि जुहू परिसरातही अशाच उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

मुंबईतील विसर्जनाची तयारी
मुंबईत विसर्जन मिरवणुकीत पहिल्यांदाच AIचा वापर करण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणुकीवर 10 हजार कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. 12 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 40 डीसीपी, 61 एसीपी तैनात आहेत. 3 हजार अधिकारी आणि 18 हजार मनुष्यबळ, 14 एसआरपीएफ, क्यूआरटी पथकं सज्ज आहेत. परवानगीशिवाय ड्रोन उडवण्यास पूर्ण बंदी. सगळ्या चौपराट्यांवर आपतकालीन परिस्थितीसाठी चौपाटीवर रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबईतल्या चौपाट्यांवर एकूण 538 लाईफ गार्ड्स सज्ज असणार आहेत.
पुण्यातील विसर्जन मिरवणुकीची कशी आहे तयारी?
पुण्यातही सकाळपासून विसर्जन मिरवणुका सुरु होतीस. मानाचा पहिला कसबा गणपती सकाळी 9.15 वाजता मंडईतील टिळक पुतळा येथे पोहोचणार आहे. सकाळी 9.30 वाजता कसबा गणपतीची मिरवणूक सुरू होईल. इतर मानाचे गणपती सकाळी 10.30 वाजता बेलबाग चौकातून लक्ष्मी रोडकडे येणार आहेत. पहिल्या पाच मानांच्या गणपतीच्या विसर्जनानंतर श्रीमंत दगडूशेठ गणपती दुपारी 4 वाजता सहभागी होणार आहे. जिलब्या मारुती गणपती आणि अखिल मंडई गणपती मंडळ 5.30 नंतर सहभागी होणार आहेत.
कसबा गणपती जाईपर्यंत अलका टॉकीज चौकाजवळ इतर मंडळांना परवानगी देण्यात आलेली नाही. मानाच्या गणपतीच्या आधी विसर्जन मिरवणूक काढण्याची इच्छा काही मंडळांनी व्यक्त केली होती. त्यावर चर्चेतून तोडगा काढण्यात आलाय. मिरवणुकीदरम्यान मंडळांमधील अंतर तोडण्यास परवानगी नसेल. टिळक पुतळा ते बेलबाग चौकादरम्यान ढोल-ताशा वाजवण्यास बंदी
बेलबाग चौकानंतरच ढोल-ताशा वाजवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. डीजे किंवा ढोल-ताशा पथक यापैकी एकच ठेवण्याची परवानगी देण्यात आलीय.
प्रत्येक मंडळात जास्तीत जास्त 2 ढोल-ताशा गट, प्रत्येकीत 60 सदस्य असतील. अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी सुरक्षेच्या दृष्टीनेही महापालिकेकडून चोख व्यवस्था करण्यात आलीय…
मिरवणुकांसाठी पुणे पोलिसांची नियमावली
लाऊडस्पिकरला रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी असेल. लाऊडस्पिकरला डेसिबल मर्यादांचे पालन बंधनकारक असणार आहे. गणेश मंडळास दोन ढोल ताशा पथकांनाच परवानगी. एकूण 60 वादकांची मर्यादा, स्थिर वादन करण्यास बंदी आहे.
ज्वालाग्राही पदार्थ मिरवणुकीत वापरास सक्त मनाई करण्यात आलीय. डोळ्यांना होणारी इजा टाळण्यासाठी लेजर लाइटवर बंदी असेल.
सार्वजनिक ठिकाणी, रुग्णालय परिसरात फटाक्यांवर बंदी असेल. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे.
पावसात मिरवणुका किती चालणार याकडं लक्ष
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सलग पाऊस सुरु आहे. त्यामुळे राज्यभरातील अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकांवर पावसाचं सावट असेल. अशा स्थितीत रात्री किती उशिरापर्यंत मिरवणुका चालणार की नेमहीप्रमाणे विसर्जनासाठी दुसरा दिवस उजाडणार हे पाहावं लागणार आहे.











