MP Breaking News
Sat, Dec 13, 2025

महाराष्ट्र बोर्डाचे कोणतेही सर्टिफिकेट मिळवा एका क्लिकवर; डिजिटल सुविधेमुळे विद्यार्थ्यांना दिलासा

Written by:Rohit Shinde
दहावी-बारावीची डुप्लिकेट मार्कशीट, स्थलांतर आणि प्रोविजनल सर्टिफिकेट आता पूर्णपणे ऑनलाइन मिळणार आहेत. दहावी-बारावीची मार्कशीट आणि इतर सर्टिफिकेट विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी, नोकरीसाठी आणि महत्त्वाच्या कामांसाठी खूप गरजेची असतात.
महाराष्ट्र बोर्डाचे कोणतेही सर्टिफिकेट मिळवा एका क्लिकवर; डिजिटल सुविधेमुळे विद्यार्थ्यांना दिलासा

महाराष्ट्र बोर्डाच्या विविध प्रमाणपत्रांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रवासात अत्यंत महत्व आहे. गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, जन्मतारीख प्रमाणपत्र, स्थलांतर प्रमाणपत्र अशा कागदपत्रांची गरज पुढील शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी लागते. या प्रमाणपत्रांमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता, ओळख आणि शैक्षणिक प्रवासाची खात्री मिळते. प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती अर्ज, सरकारी सेवेत भरती, पासपोर्ट अर्ज अशा अनेक ठिकाणी या सर्टिफिकेट्सची अधिकृत आवश्यकता असते. डिजिटल स्वरूपात ही प्रमाणपत्रे मिळाल्यामुळे वेळ, खर्च आणि त्रास कमी होतो व विद्यार्थ्यांना जलद सेवा मिळते. अशीच विद्यार्थ्यांच्या उपयोगाची सेवा आता महाराष्ट्र बोर्डाने सुरू केली आहे.

कोणतेही सर्टिफिकेट मिळवा एका क्लिकवर

आता विद्यार्थ्यांना यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी सांगितले की बोर्डाने ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. मंडळाच्या अधिकृत वेबसाइट ‘www.mahahsscboard.in’ वरून आता विद्यार्थी घरबसल्या विविध सर्टिफिकेट मिळवू शकतात. यामध्ये डुप्लिकेट मार्कशीट, डुप्लिकेट सर्टिफिकेट, प्रोविजनल सर्टिफिकेट आणि माइग्रेशन सर्टिफिकेटचा समावेश आहे.

पूर्वी या सर्टिफिकेटसाठी वेगवेगळे शुल्क आकारले जात होते. अनेकदा विद्यार्थ्यांना अर्जासाठीसुद्धा फी भरावी लागत होती. पण आता मोठा बदल करत मंडळाने सर्व स्वतंत्र शुल्क रद्द केले आहेत. आता कोणतेही सर्टिफिकेट हवे असल्यास फक्त 500 रुपये प्रति प्रमाणपत्र एवढेच शुल्क भरावे लागेल. त्यासाठी वेगळा अर्ज शुल्क घेण्यात येणार नाही.

विद्यार्थ्यांना नेमकं काय करावं लागेल ?

विद्यार्थ्यांसाठी आणखी एक महत्त्वाची सुविधा म्हणजे 1990 सालापासून आतापर्यंतचे सर्व डेटा प्रणालीमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे 1990 नंतरच्या कोणत्याही विद्यार्थ्याने सर्टिफिकेट मागितले तर त्याची सॉफ्ट कॉपी तत्काळ उपलब्ध होईल. विद्यार्थी आधार क्रमांकावर आधारित ओटीपी प्रणाली वापरून थेट ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज मिळाल्यानंतर संबंधित विभागीय मंडळाला फक्त तीन दिवसांत काम पूर्ण करणे बंधनकारक आहे. जर विद्यार्थ्याने कागदपत्रे पोस्टाने मागवली असतील तर ती स्पीड पोस्टद्वारे त्यांच्या पत्त्यावर पाठवली जाणार आहेत. या नवीन प्रणालीमुळे विद्यार्थ्यांची वेळ, पैसे आणि अनावश्यक त्रास मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. त्यामुळे या नव्या सुविधेचे विद्यार्थ्यांमधून स्वागत होताना दिसत आहे.