राज्यातील सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरूणांना दिलासा देणारी अशा स्वरूपाची एक बातमी खरंतर समोर येत आहे. एसटीमध्ये महामंडळात कंत्राटी पद्धतीने 17450 चालक व सहाय्यक पदासाठी भरती राबविण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या 2 ऑक्टोबरला त्याची निविदा प्रक्रिया सुरू होईल.अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. त्यामुळे गरजू तरूण अथवा तरूणींसाठी खरंतर ही एक मोठी संधी असणार आहे. या भरतीबाबतची प्रक्रिया आणि माहिती सविस्तर जाणून घेऊ…
कंत्राटी पद्धतीने 17,450 जागा भरणार
एसटीमध्ये भविष्यात 8 हजार नवीन बसेस येणार आहेत. त्यासाठी मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता असल्याने कंत्राटी पद्धतीने 17450 चालक व सहाय्यक पदासाठी भरती राबविण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या 2 ऑक्टोबरला त्याची निविदा प्रक्रिया सुरू होईल. भरती प्रक्रियेच्या माध्यमातून राज्यातील हजारो बेरोजगार तरुण -तरुणींना रोजगार उपलब्ध होणार असून 30 हजार रुपये इतके किमान वेतन त्यांना मिळणार आहे. त्यामुळे या संधीचा पुरेपूर फायदा होतकरू तरुण -तरुणींनी घ्यावा, असे आवाहन संबंधित विभागाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही जर योग्य उमेदवार असाल तर ही तुमच्यासाठी नामी संधी ठरू शकते.

महामंडळाला मनुष्यबळाची मोठी गरज
खरंतर एसटी ही महाराष्ट्रांची जीवन वाहिनी आहे. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात भरती करण्यात येत असते. शिवाय एसटीवरील प्रवाशांची ताण देखील वाढताना दिसत आहे. हजारो नव्या गाड्या महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. बससेवा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक असलेले चालक व सहाय्यक मनुष्यबळ भाडेतत्त्वावर कंत्राटी पद्धतीने 3 वर्ष कालावधीसाठी घेण्याकरिता ई-निविदा प्रक्रिया अवलंबण्यात येत आहे.
अर्थात, ही ई-निविदा प्रक्रिया 6 प्रादेशिक विभाग निहाय राबविण्यात येणार आहे. मनुष्यबळ पुरविणाऱ्या संस्थांकडून राज्य परिवहन महामंडळाला आवश्यक मनुष्यबळ वेळेत उपलब्ध होईल. कंत्राटी पद्धतीने भरती होणाऱ्या चालक व सहाय्यक उमेदवाराला सुमारे 30,000 वेतन देण्यात येणार आहे. याबरोबरच उमेदवारांना एसटी कडून प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे.बसेस ची वाढती संख्या त्यासाठी लागणारे हे मनुष्यबळ मिळाल्यानंतर प्रवाशांना अखंडित, सुरक्षित व दर्जेदार बससेवा पुरविणे शक्य होईल. त्यामुळे ही सुवर्णसंधी साधावी, असे आवाहन तरूणांना करण्यात येत आहे.