गोल्फ हा श्रीमंतांचा खेळ, गोरगरीबांसाठी हॉस्पिटल, शाळा, महाविद्यालय बांधावे – खासदार संजय दिना पाटील

Astha Sutar

मुंबई – मुलुंड कचराभूमीची जागा समतोल झाल्यानंतर त्या ठिकाणी गोल्फ कोर्स ऐवजी गरीब, गरजू रुग्णांसाठी अद्यावत रुग्णालय तसेच शाळा, महाविद्यालय तसेच नाट्यगृह, वाचनालय व खेळण्यासाठी व फिरण्यासाठी मैदान बांधण्यात यावे, अशी मागणी ईशान्य मुंबई, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे खासदार संजय दिना पाटील यांनी केली आहे. गोल्फ हा श्रीमंतांच्या मनोरंजनाचा खेळ असून मुलुंडमधील कचराभूमीच्या जागेचा वापर गोरगरीबांसाठी करण्यात यावा, असेही खासदार संजय दिना पाटील यांनी सुचविले आहे.

मुलुंडमध्ये विकास कामे थांबली…

भाजपचे आमदार मिहिर कोटेचा यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत मुलुंड कचराभूमिच्या जागेवर गोल्फ कोर्स करण्याची मागणी केली आहे. या मागणीबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचे कोटेचा म्हणाले. मुलुंड येथे दोडे विद्यालयाजवळ असलेल्या आरक्षित जागेवर दोन वेळा भुमिपूजन करुनही त्या ठिकाणी क्रिडा संकुल उभारता आले नाही. मुलुंड मधून सहा नगरसेवक, माजी खासदार मनोज कोटक आणि दुस-यांदा निवडुन आलेले आमदार मिहिर कोटेचा यांना स्थानिक नागरीकांचे पाठबळ असतानाही मुलुंडमध्ये विकास कामे थांबली आहेत. क्रीडा संकुलचे भुमिपूजन दिवंगत आमदार सरदार तारासिंग यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर १० वर्षे उलटली मात्र एकही विट क्रिडा संकुलाची रचता आली नाही. एक प्रकारे खासगी क्रिडा संकुलांना पाठबळ असल्यासारखी परिस्थिती आहे. खासगी क्रिडा संकुल महागडी फी घेतात. त्यांच्या स्पर्धेत एकही पालिका क्रीडा संकुल नसल्याने अशा खासगी क्रीडा संकुल धारकांचे फावत असल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे.

गोरगरीबांसाठी सुविधा व्हाव्यात..

या भागात म्हाडाचा पुर्नविकास थांबला आहे. पीएमजीपी कॉलनीत अनेकांची फसवणुक झाली असून, चारशेहून अधिक रहिवाशी बेघर झाले आहेत. या परिसरात पालिकेचे एकही अद्यावत रुग्णालय नसून सावरकर रुग्णालयात जाणा-या गंभीर रुग्णांना राजावाडी किंवा सायन रुग्णालयात पाठविले जाते. अशी भयानक परिस्थिती असतानाही गोरगरीबांसाठी हॉस्पिटल, शाळा महाविद्यालय, तसेच नाट्यगृह, वाचनालय, खेळण्यासाठी व फिरण्यासाठी मैदान बांधण्याऐवजी श्रींमंतांसाठी गोल्फ कोर्स बांधण्याची मागणी भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी केली आहे. गोल्फ कोर्सला आपला विरोध असून या ठिकाणी स्थानिक रहिवाश्यांसाठी हॉस्पिटल, शाळा, महाविद्यालय, तसेच नाट्यगृह, वाचनालय, खेळण्यासाठी आणि फिरण्यासाठी मैदान बांधण्यात यावे, अशी मागणी खासदार संजय दिना पाटील यांनी केली आहे.

ताज्या बातम्या