मराठवाडा-विदर्भात पावसाने दमदार बॅटींग सुरू केली आहे. त्यामुळे सर्वदूर चांगल्या पावसाने हजेरी लावली आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला असून, नदी दुथडी भरून वाहत आहे. या पावसामुळे जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाणी येत आहे. विशेष म्हणजे नाशिकच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीत सध्यस्थितीला पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे.
छ.संभाजीनगर, नाशिक जिल्ह्यात चांगला पाऊस
मराठवाड्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने पाठ फिरविली होती. परंतु, गेल्या तीन दिवसांपासून विभागात सर्वदूर संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेती पिकांना जीवदान मिळालं आहे. चोवीस तासांत मराठवाड्यात सरासरी २५.५ मि.मी. पावसाची नोंद झाली. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. तसेच नाशिकच्या पश्चिम भागातील सह्याद्री डोंगररांगेत चांगला पाऊस पडत आहे. परिणामी गोदावरी नदीत पाण्याची आवक चांगली असल्याने या पाण्याचा फायदा जायकवाडी धरणातील पाणीसाठ्याला होत आहे.
मराठवाड्याचा पाणीप्रश्न वर्षभरासाठी मिटणार!
जायकवाडी धरण 2019, 2020, 2021, 2022 आणि 2024 या चार वर्षांत 100 टक्के भरले आहे. मात्र, 2023 मध्ये केवळ 47.23 टक्क्यांपर्यंतच पाणीसाठा झाला होता. यंदाही लवकरच धरण 100 टक्के भरण्याची शक्यता आहे. धरण भरल्यास छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील पाच जिल्हे आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या काही भागांतील पिण्याच्या पाण्याचा, सिंचनाचा व औद्योगिक वापरासाठीच्या पाण्याचा प्रश्न वर्षभर सुटण्याची शक्यता आहे.
पावसामुळे पीके वाचली; शेतकऱ्यांना मोठा दिलासा
छत्रपती संभाजीनगरसह विभागातील काही जिल्ह्यांमध्ये जवळपास वीस दिवसांपासून पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे हजारो हेक्टरवरील पिके धोक्यात आली होती. परिणामी, शेतकरी चिंतातुर झाला होता. मात्र, २४ जुलैपासून पावसाचे दमदार पुनरागमन झाले आहे. तीन दिवसांपासून सर्वच जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात कुठं रिमझिम तर कुठं दमदार पाऊस पडतो आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस पडत आहे.





