जयंत पाटील यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या गोपीचंद पडळकरांना मुख्यमंत्र्यांनी सुनावले; पवारांचा थेट फडणवीसांना फोन

Smita Gangurde

मुंबई- सांगली जिल्ह्यातील अभ्यासू नेते, शरद पवार राष्ट्रवादीचे नेते, माजी अर्थमंत्री जयंत पाटलांवर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेनं ते चांगलेच वादात सापडलेत. जयंत पाटील यांचे वडील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, सहकार महर्षी स्वर्गीय राजारामबापू पाटील यांचा उल्लेख पडळकरांनी एकेरी केला, इतकच काय तर जयंत पाटील हे राजारामबापू पाटील यांची औलाद वाटतं नाही अशी आक्षेपार्ह भाषा त्यांनी वापरली

पडळकरांच्या वक्तव्याचे राजकीय पडसाद

भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचे सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांकडून निषेध केला गेला. ज्येष्ठ नेते शरद पवारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन लावत बेताल वक्तव्य करणाऱ्यांना आवरा असा सल्ला दिला. तर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना समज द्यावी अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली. काँग्रेस नेते सतेज पाटलांनी संयत भाषेत पडळकरांना चपराक लगावली.

गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेली टीका ही महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेचा आणि राजारामबापू पाटील कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा अवमान आहे. पडळकर यांनी वापरलेली असभ्य भाषा ही स्तरहीन आणि समाजातील सभ्यता पायदळी तुडवणारी आहे. भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाच्या आमदाराने सार्वजनिक मंचावर अशा शब्दांचा वापर करणे हे महाराष्ट्राच्या परंपरेचा अपमान आहे, अशी टीका करण्यात येतेय.

गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात आंदोलन

जयंत पाटलांबाबत केलेल्या वादग्रस्त टीकेनंतर गोपीचंद पडळकरांविरोधात संतापाची लाट आहे. धुळ्यात पडळकर यांच्या प्रतिमेला काळं फासत, जोडे मारत आंदोलन निषेध केला. तर वरळीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनं खालची पातळी गाठत एका श्वानाच्या गळ्यात पडळकर यांचा फोटो बांधला. सांगलीतही पडळकर यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आलं.

मुख्यमंत्र्यांनी दिली समज

या सगळ्या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. गोपीचंद पडळकर यांनी बोलताना भान राखायला हवे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. पडळकर हे आक्रमक नेते आहे, आक्रमकपणा दाखवताना बोलण्याचा काय अर्थ निघेल याचं ते भान बाळगत नाहीत. हे लक्षात घेऊन आक्रमकपणा दाखवला पाहिजे, अशी सूचना त्यांना केल्याचं फडणवीसांनी म्हटलय. तर मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्याचं मान्य केलं असलं तरी पडळकरांनी माफीस किंवा दिलगिरी व्यक्त करण्यास नकार दिलाय. त्यामुळं गोपिचंद पडळकरांना सत्ताधारी भाजपाचा आशीर्वाद आहे का, असा सवाल उपस्थित होतोय

सत्ता आल्यापासून पडळकर आक्रमक

राज्यात महायुतीची सत्ता आल्यापासून आमदार गोपीचंद पडळकर सातत्यानं गरळ ओकताय. यावरुन पावसाळी अधिवेशनात तर पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड राडा झाला होता. मात्र त्यानंतरही पडळकर सुधारण्याचं नाव घेत नाहीय त्यांच्या भाषणांची शैली नेहमीच उन्माद दाखवणारी आणि वाद निर्माण करणारी आहे. खरतर आता जयंत पाटलांवर केलेल्या टीकेनंतर पडळकरांची कानउघडणी करण अपेक्षित होतं, मात्र ते झालेलं दिसलं नाही

ताज्या बातम्या