MP Breaking News
Thu, Dec 18, 2025

‘सरकार भिकारी आहे’ हा मंत्र्यांचा असंवेदनशीलतेचा कळस, महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक लावू नका, काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

Written by:Astha Sutar
Published:
सातत्याने वादग्रस्त विधाने करून माणिकराव कोकाटे यांनी मंत्रीपदाची प्रतिमा मलीन केली आहे. अशा व्यक्ती मंत्रिपदावर राहणे राज्याच्या व शेतकऱ्याच्या हिताचे नाही. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण हे चिंताजनक असून महाराष्ट्राला ते भूषणावह नाही
‘सरकार भिकारी आहे’ हा मंत्र्यांचा असंवेदनशीलतेचा कळस, महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक लावू नका, काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

Congress – मंत्रिमंडळात नमुने म्हणजे माणिक, मोती अशी रत्नेच शोभावी अशी आहेत. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी तर कहरच केला आहे. आता तर त्यांनी सरकारच भिकारी आहे हे सांगून असंवेदनशीलतेचा कळस केला आहे. अशा मंत्र्याला एक मिनिटही पदावर ठेवण्याची गरज नाही. पण मुख्यमंत्री त्याला का पाठिशी घालत आहेत? कोकाटेंची हकालपट्टी करण्याची फडणवीस यांच्यात हिम्मत नाही का? असा प्रश्न काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.

राज्याची परंपरा धुळीस मिळवण्याचे काम…

दरम्यान, कोकाटेंचा जुगार खेळण्याचा प्रकार निर्लज्जपणाचा कळस असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही ते जुमानत नाहीत असे त्यांच्या विधानांवरून दिसत आहे. अशा मुजोर मंत्र्याला तात्काळ घरचा रस्ता दाखवला पाहिजे पण तसे होत नाही हे पाहता फडणवीस यांची काही तरी मजबुरी असेल म्हणून ते कारवाई करण्याची हिम्मत दाखवत नाहीत.

कारण काहीही असो अशा व्यक्तीमुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेला तडा जातो त्याची तरी काळजी करा, असे सपकाळ म्हणाले. तसेच महाराष्ट्राला एक मोठी राजकीय परंपरा व संस्कृती लाभलेली आहे पण तीच धुळीस मिळवण्याचा विडा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने उचलला आहे काय ?, असा प्रश्न हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला आहे.

मी काय विनयभंग केला आहे का?

दरम्यान, कोकाटे हे विधानसभेत ऑनलाईन रमी खेळतानाचे व्हिडिओ प्रसार माध्यमासह समाज माध्यमांवरही सर्वांनी पाहिले आहेत. कोकाटे हे सतात बेताल वक्तव्य करताना दिसत आहे. शेतकऱ्याला भिकारी म्हणालो नाही तर ‘सरकारच भिकारी आहे’, राजीनामा दयायला मी काय विनयभंग केला आहे का? अशी मुक्ताफळे उधळून हे महाशय आपण काहीच चुकलो नाही असे बिनधास्त सांगत आहेत. त्यामुळं यांच्या तत्काळ राजीनामा घेतला पाहिजे, असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

नारळ देऊन घरी पाठवा…

शेतकरी अडचणीत आहे, अवकाळी पावसाने झालेली नुकसान भरपाई दिलेली नाही. शेतमालाला भाव नाही, कर्जमाफीचे आश्वासन देऊनही त्याचा निर्णय होत नाही, राज्याच्या काही भागात दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. अशा अनेक संकटाचा सामना शेतकरी करत असताना त्याकडे कोकाटे गांभिर्याने पहात नाहीत. त्यामुळे कोकाटेंचा तातडीने बंदोबस्त करा व नारळ देऊन घरी पाठवा, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.