Marathwada flood : राज्यातील मराठवाडा बीड, अहिल्यानगर, अमरावती परभणी आदी जिल्ह्यांना पावसाचा तडाखा बसला असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळावी यासाठी शासनाने पाऊल उचलले असून, नुकसानग्रस्तांना पाच हजार रुपये आणि अन्नधान्याचा पुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली, यानंतर मदतीचा ओघ सुरु केला आहे.
नेक गावातील जनजीवन विस्कळीत
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी पवार यांनी बीड तालूक्यातील मौजे पिंपळगाव घाट, मौजे हिंगणी खुर्द, मौजे आहेर चिंचोली, खामगाव, नांदूर हवेली तर शिरुर कासार तालूक्यातील खोकरमोहा आणि येवलवाडी आणि गेवराई तालूक्यातील इटकूर या गावांना भेट देवून येथील पाऊस व पुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. बीड जिल्ह्यातील नद्यांना आलेल्या पुरामुळे नदी काठावरील अनेक गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही गावात नदीचे पाणी घरात व शेतशिवारात घुसल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

शासन सर्वोतोपरी मदत करणार
जनतेवर आता जे नैसर्गिक संकट आले ते खुप मोठे असून, बाधितांना शासन मदत करणार आहे. तसेच या पुरामुळे अनेक नागरिक बेघर झाले असून, त्यांच्या राहण्याची व जेवणाची सोय करण्यात यावी. शासन नागरिकाच्या पाठीशी ख्ंबिरपणे उभे असून, कोणीही काळजी करू नये. या नैसर्गिक संकटामुळे बाधित नागरिकांना शासन सर्वोतोपरी मदत करणार आहे. येणाऱ्या यंत्रणेमार्फत संकटात असलेल्या नागरिकांना दिलासा देण्याचे काम सुरु आहे. आता बरेच पाणी ओसरले असल्याने उद्यापासून पंचनामे जास्त गतीने सुरु होतील.
नुकसानीचे पंचनामे व्यवस्थित करावेत
पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे व्यवस्थित करावेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतरच जिल्ह्यातील किती हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे व किती नुकसान झाले याची नेमकी आकडेवारी प्राप्त होईल. तसेच ज्या भागात ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्यानंतर त्या भागात अतिवृष्टी झाल्याचा नियम आहे. परंतु ज्या ठिकाणी ६५ मिमीपेक्षा कमी पाऊस झाला, परंतू त्याठिकाणी जास्त नुकसान झाले असल्यास तेथील परिस्थिती बघून बाधीतांना शासन मदत करणार असल्याचे सांगितले. तसेच या नैसर्गिक संकटातून जनतेला बाहेर काढण्यासाठी जे काही करावे लागेल ती मदत शासनमार्फत करण्यात येणार आहे.