MP Breaking News
Thu, Dec 18, 2025

राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता, कोकण-पश्चिम महाराष्ट्राला अलर्ट; हवामान विभागाचा अंदाज काय?

Written by:Rohit Shinde
Published:
राज्यात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेषत: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अधिक पाऊस कोसळण्याची शक्यता आहे, हवामान विभागाचा अंदाज सविस्तर जाणून घेऊ...
राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता, कोकण-पश्चिम महाराष्ट्राला अलर्ट; हवामान विभागाचा अंदाज काय?

हवामान विभागाचे पावसाबाबतचे अंदाज सातत्याने समोर येत आहेत. राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे.  ताज्या निरीक्षणांवरून असे दिसून आले आहे की कमी दाबाचा पट्टा किनारपट्टी ओलांडत आहे. राज्याच्या काही भागात आज मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाज आहे.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला अलर्ट

भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक केंद्राने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात आज काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण-गोव्यातील काही जिल्ह्यांमध्ये आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट भागातील काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे. तर उर्वरीत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पाऊस सर्वसाधारण स्वरूपाचा राहणार आहे.

हवाान विभागाकडून आज कोकणसह, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत वादळी वारा आणि विजाच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मराठवाडा जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या ठिकाणी 50-60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

मान्सून केरळात, महाराष्ट्रात कधी?

मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला असल्याची अधिकृत घोषणा भारतीय हवामान खात्याने केली आहे. यापूर्वी 2009 मध्ये मान्सून केरळात 23 मे रोजी दाखल झाला होता. त्यानंतर 15 वर्षांनी मान्सून इतक्या लवकर केरळात दाखल झाला आहे. विशेष म्हणजे मान्सून केरळात दाखल व्हायला आणखी एक आठवडा लागू शकतो, असं सांगितलं जात असताना मान्सून एक आठवडा आधीच दाखल झाला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचा पाऊस राज्यात एंट्री घेणार आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचा पाऊस तळकोकणात दाखल होण्याचा अंदाज आहे. पुढील चार ते पाच दिवसांत मान्सून कोकणात दाखल होण्याची शक्यता असून कोकणात सध्या जोरदार मान्सूनपूर्व पाऊस सुरु आहे. मुंबईत 1 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केरळ हे मान्सूनचे भारतातील प्रवेशद्वार मानले जाते. केरळात प्रवेश केल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून देशभरात आगेकूच करतो. त्यामुळे 1 ते 6 जूनच्या दरम्यान मान्सूनचा पाऊस महाराष्ट्राचा बराच भाग व्यापेल. पुढे त्यानंतर उत्तर भारताच्या दिशेने मान्सूनची आगेकूच सुरू होत असते.