पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता; 15 जिल्ह्यांना अलर्ट जारी

Rohit Shinde

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राचा प्रभाव म्हणून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यातील एकूण 15 जिल्ह्यांना हवामान विभागाने 4 ऑक्टोबर रोजी यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे उद्या दिवसभरात आणि आगामी काही दिवसांत राज्यातील हवामानाची एकूणच स्थिती कशी असेल, ते सविस्तर जाणून घेऊ…

24 तास, 15 जिल्ह्यांसाठी अलर्ट

मुंबई शहर आणि उपनगरामध्ये साधारणपणे ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही ढगाळ आकाशासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्याला हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि 30 ते 40 किमी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

मराठवाड्यातील एकूण सहा जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली हे ते सहा जिल्हे आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्येही विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होऊ शकतो. दर्भातील एकूण सात जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जाहीर केला आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. यलो अलर्ट जारी असलेल्या या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होऊ शकतो.

महाराष्ट्रातील पाऊस कधी थांबणार?

महाराष्ट्रातील पाऊस पूर्णपणे कधी थांबणार? असा सवाल शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात आहे. याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, 5 ऑक्टोबरपर्यंत मान्सूनचा परतीचा पाऊस संपण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यानंतर वादळामुळे अवकाळी पावसाचं संकट राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. ऑक्टोबर हिटचा फटका विशेषतः रात्री जाणवू शकतो. महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटदरम्यान अति उष्ण तापमान नसेल, पण दमट हवामानामुळे उकाडा वाढेल आणि घामाच्या धारांनी लोक हैराण होतील. तरी देखील 12 ऑक्टोबरपर्यंत कमी अधिक प्रमाणात पावसाची शक्यता कायम आहे.

ताज्या बातम्या