महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासूनच पावसाचा जोर चांगलाच वाढताना दिसत आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. दक्षिण महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये तीव्र पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने पावसाचा हा जोर आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत अथवा जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे जनजीवन चांगलेच विस्कळीत झाले आहे. बुलढाणा, यवतमाळ जिल्ह्याला पावसाचा चांगलाच फटका बसला आहे.
बुलढाणा, यवतमाळमध्ये जनजीवन विस्कळीत
शुक्रवारी मध्यरात्रीपासून बुलढाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शनिवारी जिल्ह्यातील देऊळगाव राजा, चिखली आणि सिंदखेड राजा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली. पुरामुळे काही गावांचा संपर्क तुटला. चिखली तालुक्यातील पांढरदेवसह भोरसा भोरसी, वरखेड, सावंगी गवळी, मंगरुळ नवघरे, घानमोड मानमोड, अंबाशी, खैरवसह अन्य गावांमध्ये शनिवारी सकाळी ढगफुटीसदृश पाऊस पडल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. उभी पिके पाण्याखाली गेली. घरांची पडझड झाली. दुपारी दीड वाजेपर्यंत पावसाची मुसळधार कायम होती.
गेल्या २४ तासांत यवतमाळ तालुक्यातील हिवरी, दारव्हा तालुक्यातील मांगकिन्ही, पुसद तालुक्यातील पुसद, गहुली, शेंबाळपिंप्री, बेलोरा, बोरी व महागाव तालुक्यातील कासोला या आठ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. सर्वात जास्त फटका पुसद तालुक्याला बसला आहे.
देशातील 11 राज्यांत पावसाचा जोर वाढणार!
गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक भागांमध्ये मान्सूनचा जोर काहीसा मंदावलेला दिसत आहे. पावसाची तीव्रता कमी झाल्यामुळे काही ठिकाणी उष्णतेची चाहूल लागली आहे. मात्र, पुढील आठवड्यात हवामानात मोठा बदल होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. स्कायमेट वेदरच्या अहवालानुसार, सोमवारपासून देशभरातील 11 राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रातही या पावसाचा मोठा प्रभाव दिसू शकतो. त्यामुळे महाराष्ट्रासाठी आगामी काही दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.





