MP Breaking News
Wed, Dec 17, 2025

विदर्भ-मराठवाड्यात बहुतांश भागात दमदार पाऊस; शेतांमध्ये पाणी, अनेक गावांचा संपर्क तुटला!

Written by:Rohit Shinde
Published:
संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाचे प्रमाण चांगले आहे.
विदर्भ-मराठवाड्यात बहुतांश भागात दमदार पाऊस; शेतांमध्ये पाणी, अनेक गावांचा संपर्क तुटला!

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई उपनगरांमध्ये रात्रभर पावसाची संततधार सुरू होती. विदर्भात आणि मराठवाड्याच्या काही भागात ढगफुटीसदृश पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतांमध्ये पाणी शिरले असून, पूल वाहून गेल्याने वीजेचे खांब कोसळ्याने अनेक गावांचा संपर्क तुटल्याची माहिती समोर येत आहे. समस्या सोडविण्यासाठी प्रशासन युध्द पातळीवर काम करत आहे.

विदर्भात मुसळधार पावसाची हजेरी

पश्चिम विदर्भातील अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये मंगळवारी पहाटेपासून सुरू झालेल्या दमदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. चार ते पाच तास कोसळलेल्या संततधारेमुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक गावांमध्ये घरांची पडझड झाल्याने संसार उघड्यावर आले आहेत.

लढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यात मंगळवारी पहाटे चार तास बरसलेल्या दमदार पावसामुळे अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यामुळे नद्या-नाल्यांना पूर येऊन हजारो हेक्टरमधील उभी पिके पाण्याखाली गेली आहेत. देऊळगाव कुंडपाळ, अजिसपूर, धाड, पांग्रा डोळे, टिटवी, लोणार, हिरडव, बोरखेडी, गुंधा या भागांत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

लोणार तालुक्यात अतिवृष्टीमुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून, काही नद्यांच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने चार मार्गांवरील गावांचा संपर्क तुटला होता. यात हिरडव ते लोणार, लोणार ते देऊळगाव कुंडपाळ, अजिसपूर ते खुरमपूर, वडगाव ते वडगाव फाटा या मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली होती. टिटवी, देऊळगाव कुंडपाळ आणि गुंधा लघु पाटबंधारे प्रकल्प १०० टक्के भरले असून सांडव्याद्वारे विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या देऊळगाव कुंडपाळ, टिटवी, रायगाव, नांद्रा, गुंजखेड, मोहोतखेड या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मराठवाड्यात समाधानकारक पाऊस

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात काल जोरदार पाऊस झाला. ढालेगाव येथील बंधाऱ्याचे दोन दरवाजे उघडल्याने गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे गोदाकाठच्या शेतीला फायदा होणार असून, महिनाभरापासून पाऊस नसल्याने सुकलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंघावत होतो. पण, गेल्या काही दिवसांत पावसाने चांगलीच हजेरी लावल्यामुळे शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात 117.8 मिमी पावसाची नोंद झाली असून, मौजे हदगाव नखाते येथे सात ते आठ नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते.

राज्यात पावसाचा जोर वाढणार

महाराष्ट्रात पुढील 24 तास पावसाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ-मराठवाड्यातील काही भागात या काळात मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्ये आणि सातारा व कोल्हापूरच्या घाटमाथ्याच्या भागात पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना मिळाल्या असून, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन पथकांना देखील सज्ज ठेवण्यात आले आहे.